Team Agrowon
पडीक जमिनी किंवा जंगलामध्ये बिया केवळ उधळून दिल्यास त्यापासून झाडे वाढण्याचे प्रमाण कमी असते. कारण अनेक बिया कीटक, मुंग्या, पक्षी आणि जनावरांकडून खाल्ल्या जातात.
बुरशींची वाढ होऊन त्या नष्ट होतात. तसेच अनेक बिया दगडांवर पडतात, तिथे थोडीही माती नसल्याने बिया उगवण्यात अडचणी येतात. वाहत्या पाण्यासोबत एकाच जागेवर जमा होतात.
वृक्षारोपणामध्ये येणाऱ्या अशा अडचणींवर मात करण्यासाठी बीज गोळे किंवा सीड बॉल ही संकल्पना राबवली जाते.
हे गोळे माती आणि बियांपासून तयार केले जातात. त्याला ‘सीड कॅप्सूल’ म्हणूनही ओळखले जाते. यात बिया सुरक्षित राहतात.
स्थानिक माती किंवा सेंद्रिय खताचा वापर करून तयार केलेल्या चिखलाचे गोळे तयार केली जातात. त्यात ज्यांचे रोपण करावयाचे आहे, त्या बिया आत भरल्या जातात.
या बिया स्थानिक पातळीवरील वनक्षेत्रातून किंवा आजूबाजूच्या क्षेत्रातून गोळा केल्यास त्यांची वाढ चांगल्या प्रकारे होते.
बीज गोळे तयार करण्याकरिता तीन भाग सुपीक माती, एक भाग गांडूळ खत किंवा सेंद्रिय खत एकत्रित केले जाते. या मातीमध्ये थोडा भुस्सा किंवा कोंडा मिसळला जातो.