Team Agrowon
इंडोनेशियाने आपल्या पामतेल निर्यात धोरणात सातत्य राखावे, असा सल्ला भारतातील तेल प्रक्रिया उद्योजकांनी इंडोनेशियाला दिला आहे.
सॉल्व्हंट एक्सस्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या (SEA) शिष्टमंडळाने दिल्लीत नुकतीच इंडोनेशियाचे व्यापार मंत्री झूलकीफ्ली हसन यांच्या नेतृत्वाखालील इंडोनेशियन प्रतिनिधीमंडळाची भेट घेतली.
भारत इंडोनेशियाकडून मोठ्या प्रमाणात पामतेल आयात करतो. मात्र इंडोनेशिया सरकारच्या निर्यात धोरणात सातत्य नसल्याचा फटका भारताला बसतो.
इंडोनेशियाने पाम तेलाच्या निर्यातीवर बंदी घातली. काही काळानंतर ही बंदी उठवण्यात आली. पण इंडोनेशियाच्या निर्यात धोरणात सातत्य नसल्यामुळे पुरवठा साखळी विस्कळीत झाली.
त्याचा भारताला मोठ्या प्रमाणावर फटका बसला, असे एसईएच्या शिष्टमंडळाने यावेळी सांगितले. पाम तेल निर्यात धोरणातील धरसोडपणामुळे इंडोनेशिया सरकारचे आर्थिक नुकसान होत आहे.
इंडोनेशियाला भारतीय बाजारातील आपला निर्यातीचा हिस्सा गमावावा लागला. इंडोनेशियाची जागा मलेशियाने घेतली. तसेच पामतेलाऐवजी इतर तेलांची मागणी वाढली, याकडे यावेळी एसएईने लक्ष वेधले.
इंडोनेशिया सरकारने पाम तेल निर्यात शुल्क आणि कर आकारणीतही सातत्य राखावे, अशी मागणीही एसइएने यावेळी हसन यांच्याकडे केली.