Team Agrowon
वातावरणातील बदलामुळे वाढलेले तापमान, दिवस आणि रात्रीच्या तापमानातील तफावत, पावसाचा खंड या सर्व घटकांचा कापसाच्या वाढीवर विपरीत परिणाम होतोय.
बदलत्या वातावरणामुळे झाडांमध्ये अन्न घटक कमी प्रमाणात तयार होतात. त्यामुळे अन्न घटकांचं वहन पाते, फुले, बोंडे यापर्यंत होण्यात अडथळे येतात. त्यामुळे कपाशीमध्ये पातेगळ होतेय.
अन्नद्रव्यांचा अपुरा पुरवठा, अजैविक ताण तसच किडीच्या प्रादुर्भावामुळे झाडातील इथिलीनची निर्मिती वाढते. इथिलीनमुळे पात्यांच्या देठाजवळील पेशी कमकुवत होतात, त्यामुळे मोठ्या प्रमाणात पातेगळ होते.
पाते तयार करण्यासाठी झाडाला पानांच्या तुलनेने जास्त ऊर्जा लागते. त्यामळे झाडाला ऊर्जेची आणि अन्नद्रव्यांची कमतरता भासते. त्यामुळेही कपाशीमध्ये पातेगळ होते.
पातेगळ होण्याच दुसरं महत्वाच कारण आहे वातावरणातील बदल. जर पावसाचा मोठा खंड पडला आणि त्यानंतर अचानक मोठा पाऊस झाला तर नैसर्गिक पातेगळ मोठ्या प्रमाणावर होते.
गळणारे पाते शक्यतो एकाच अवस्थेतील असल्यास अशी पातेगळ ही नैसर्गिक कारणांमुळे झालीय असं समजावं. तसचं ही पातेगळ आपल्याला संपूर्ण शेतात झालेली दिसते.
या उलट कीड -रोगांमुळे जेव्हा पातेगळ होते, तेव्हा पडलेली पाते वेगवेगळ्या अवस्थेतील असतात. पातेगळ शेतातील विशिष्ट भागात असू शकते.
पात्याच्या खालील भागामध्ये प्रथिनांचे प्रमाण जास्त असत. अनेक किडी तिथे डंख मारतात आणि त्यामुळे पातेगळ होते. त्यामुळे अशा पात्यांचं निरीक्षण केलं तर, आपल्याला या पात्यांचा खालच्या भागात किडींचा डंख दिसून येतो.