sandeep Shirguppe
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांच्यावर रविकांत तुपकर यांनी अप्रत्यक्षपणे आरोप करत संघटनेतील अंतर्गत नाराजी उघड केली.
बुलडाणा येथे कार्यकर्ता मेळावा घेत तुपकरांनी 'स्वाभिमानी'मधील काही वरिष्ठांवर थेट नाराजीचा सूर व्यक्त केला. त्यांनी २० वर्षात चळवळीत कामाचा लेखाजोखाच मांडला.
यावर माजी खासदार राजू शेट्टी यांनी हे पेल्यातलं वादळ आहे पेल्यातच शमेल अशी प्रतिक्रीया देत वादावर पडदा पाडण्याचा प्रयत्न केला.
परंतु रविकांत तुपकर यांनी राजू शेट्टी हे स्थानिक मुद्दा पुढे करून मूळ विषयाला बगल देत असल्याचे सांगत. माझा राजू शेट्टी यांच्या कार्यपद्धत आणि नेतृत्वावर आक्षेप असल्याचा आरोप केला.
तुपकर हे बुलडाणा लोकसभा मतदार संघातून तयारी करत आहेत ते स्वाभिमानीचे लोकसभेचे उमेदवारही असतील असे राजू शेट्टी म्हणाले. याचबरोबर हा वाद संपवला जाईल असेही त्यांनी सांगितल.
यावर रविकांत तुपकर यांनी राज्याच्या कानाकोपऱ्यात फिरून तरुणांना एकजूट केले पण आपल्यावर अन्याय होत असेल तर राज्यभर रान उठवणार असल्याची घोषणा केली.
संघटनेत वर्षानुवर्षे काम करणाऱ्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना परस्पर पदांवरून काढून टाकले. याबाबत विचारणा आपणास होत नसल्याचे सांगत आपणही तुमच्या जिल्ह्यात येऊ शकतो असे तुपकर म्हणाले.
राजू शेट्टी यांनी तुपकरांना स्वाभिमानीतून प्रदेशाध्यक्ष पद दिले होते. यानंतर त्यांना वस्त्रोद्योग महामंडळाच्या अध्यक्षपदावर बसवले. परंतु तुपकर यांनी नाराजी व्यक्त केल्याने हा वाद चव्हाट्यावर आला आहे.
रविकांत तुपकर यांनी अप्रत्यक्षरित्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेवरच दावा केल्याचीही चर्चा आहे. दरम्यान आगामी काळात ते कोल्हापूर जिल्ह्याचा दौराही करणार असल्याची चर्चा आहे.
विदर्भ स्वाभिमानी युवा आघाडीचे प्रशांत डिक्कर आणि रविकांत तुपकर यांच्यातील वाद मुख्य कारण असल्याचे बोलले जात असले तरी तुपकर यांनी असे काही नसल्याचे स्पष्ट केले आहे.