Team Agrowon
गेल्या काही दिवसांपासून सतत पडणाऱ्या पावसाने (Rain) पुरंदर, दौंड, शिरूर, खेड, जुन्नर, आंबेगाव, हवेली तालुक्यांत चांगलाच धुमाकूळ घातला आहे.
यामुळे पिकांमध्ये (crop) मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. सध्यादेखील काही ठिकाणी पिकांमध्ये पाणी साचले असून, पाऊस सुरू असल्याने त्यात आणखी भर पडत आहे.
पावसाने काही ठिकाणी चांगलेच थैमान घातल्याने बहुतांश तालुक्यांमध्ये पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेती, रस्ते, पूल, घरे यांचेही नुकसान झाले आहे.
गणेश विसर्जनानंतर पावसाने पुन्हा जोर (Pune Rain Intensity) धरण्यास सुरुवात केली आहे. मागील दोन दिवसांपासून पुणे जिल्ह्याच्या विविध भागांत ढगाच्या गडगडाटासह जोरदार (Heavy Rainfall) पाऊस होत असून, तुरळक ठिकाणी ढगफुटीसदृश्य (Rain Like Cloudburst) पाऊस पडत आहे.
या पावसामुळे पुणे शहरातील ओढ्यालगतच्या घरांमध्ये पाणी शिरले आहे. तर, काही ठिकाणी झाडे पडल्याच्या घटना घडल्या.
ग्रामीण भागात भात, कांदा, बाजरी, सोयाबीन, मूग, भुईमूग, मेथी, कोथिंबीर, वाटाणा, ऊस यांसह काही प्रमाणात फळझाडांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
भोर तालुक्यातील किकवी, आंबवडे, संगमनेर, निगुडघर, भोर, मावळमधील तळेगाव, कार्ला, खडकाळा, लोणावळा, शिवणे, जुन्नरमधील नारायणगाव, जुन्नर, राजूर, डिंगोरे, आपटाळे, ओतूर, खेडमधील पाईट, आंबेगावमधील आंबेगाव शहर, शिरूरमधील टाकळी, वडगाव, न्हावरा, तळेगाव, शिरूर, कोरेगाव, बारामतीतील वडगाव, लोणी, बारामती, मोरगाव, उंडवडी, इंदापुरातील भिगवण, इंदापूर, लोणी, बावडा, काटी, निमगाव, दौंडमधील वरंवड, पुरंदर भिवंडी, परिंचे या मंडळांतही पावसाच्या हलक्या सरी पडल्या. ओढे, नाले भरून वाहिल्याने अनेकांच्या शेतात पाणी शिरले होते.