Anil Jadhao
भारतात यंदा कापूस उत्पादन वाढीचा अंदाज व्यक्त होत असला तरी निर्यातही वाढेल, अशी शक्यता व्यक्त होतेय. त्याचं मुख्य कारण म्हणजे पाकिस्तानधील कापूस उत्पादनात झालेली मोठी घट.
पाकिस्तानमध्ये सिंध आणि पंजाब ही दोन महत्वाची कापूस उत्पादक राज्ये आहेत. मात्र या दोन्ही राज्यांमध्ये पुरानं थैमान घातलंय. त्यामुळं पाकिस्तानमधील कापूस उत्पादन २० ते २५ टक्क्यांनी घटेल, असा अंदाज आहे.
सिंध प्रांतातील जवळपास ८० टक्के पिकाचं नुकसान झालं. तर पंजबामधील पिकालाही ६ टक्के फटका बसलाय. हंगामाच्या सुरुवातीला पाकिस्तानमध्ये यंदा ११० लाख गाठी कापूस उत्पादनाचा अंदाज व्यक्त होत होता. मात्र आता उत्पादन ६५ ते ७५ लाख गाठींच्या दरम्यानच स्थिरावेल, असा अंदाज व्यक्त होतोय.
पाकिस्तानमधील कापड उद्योगाला दरवर्षी १४० लाख गाठींच्या दरम्यान कापसाची गरज असते. म्हणजेच पाकिस्तानला दरवर्षी जवळपास निम्मी गरज आयात करून भागवावी लागेल. यंदा पिकाचं नुकसान झाल्यानं पाकिस्तानला अतिरिक्त ३० लाख गाठींची आयात करावी लागेल, असा अंदाज येथील उद्योगानं व्यक्त केलाय.
पाकिस्तानच्या एकूण आयातीपैकी तब्बल ३५ ते ४० टक्के अमेरिकेतून होते. मात्र यंदा अमेरिकेतही कापूस उत्पादन ४७ लाख गाठींनी कमी होणार आहे. तर निर्यातही २६ लाख गाठींनी घटणार आहे. त्यातच अमेरिकेतील कापसाची विक्री जवळपास पूर्ण होत आली आहे. बहुतांश शेतकऱ्यांनी कापसाचे व्यवहार पूर्ण केले. त्यामुळं पाकिस्तानला कापसासाठी इतर देशांवर अवलंबून राहावं लागेल.
पाकिस्तानला कापूस पुरवठ्याची क्षमता फक्त भारताकडे असेल. बांगलादेश हा भारताचा पारंपरिक कापूस खरेदीदार आहे. भारताच्या एकूण कापूस निर्यातीपैकी तब्बल निम्मा कापूस बांगलादेश खरेदी करत असतो. मात्र यंदा पाकिस्तानकडूनही मागणी येऊ शकते.