Anil Jadhao
यंदा पाकिस्तानमधील कापूस पिकाला पुराचा मोठा फटका बसला. त्यामुळे यंदा पाकिस्तानमधील कापूस उत्पादन २९ लाख गाठींनी घटण्याचा अंदाज आहे. तर येथील उद्योगाच्या मते उत्पादन ४८ लाख गाठींवर स्थिरावेल.
पाकिस्तानमधील कापूस उत्पादन कमी झाल्याने आयात वाढविण्याशिवाय पर्याय नाही. तसेही सामान्य उत्पादन झालेल्या स्थितीतही पाकिस्तानला आयात करावी लागते. मात्र यंदा पाकिस्तानची कापूस आयात ७० लाख गाठींवर पोचण्याचा अंदाज आहे.
पाकिस्तानमधील कापूस उत्पादनाची स्थिती लक्षात घेऊन येथील उद्योगांनी जवळपास ५० लाख गाठी कापूस खरेदीचे करार केले आहेत. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे दर वाढलेले आहेत. याचा फटका पाकिस्तानी उद्योगाला बसत आहे.
सध्या आंतरराष्ट्रीय बाजारातही कापूस दर काहीसे टिकून आहेत. त्यातच डाॅलरचे मूल्य वाढल्यानेही आय़ातीत अडचणी येत आहे. त्यामुळे खरेदीदार स्थानिक कापसालाच जास्त पसंती देत आहेत, असे येथील उद्योगांनी स्पष्ट केले.
सध्या पाकिस्तानमध्ये रुईला प्रतिक्विंटल ३६ हजार २५० ते ४२ हजार ५०० पाकिस्तान रुपये दर मिळत आहे. तर कापसाची सरासरी १२ हजार ५०० २० हजार पाकिस्तानी रुपये प्रतिक्विंटलने खरेदी केली जात आहे. कापसाबरोबरच सरकीपेंडही तेजीत आहे.
पाकिस्तानधील शेतकऱ्यांनी आतापर्यंत ४२ लाख गाठी कापसाची विक्री केली आहे. मागीलवर्षी याच काळात प्रक्रिया झालेल्या कापसाच्या तुलनेत यंदा ४० टक्क्यांनी प्रमाण कमी आहे, असे पाकिस्तानमधील जिनिंग उद्योगाने सांगितले.