Team Agrowon
वर्षापासून कांद्याला दर (Onion Rate) मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त होते. दरवाढीच्या प्रतीक्षा करत शेतकऱ्यांनी नाइलाजाने मिळेल त्या दरात कांदा विक्री केली.
आता शेतकऱ्याच्या चाळीतील कांदा संपला अन बाजारातील दर वाढू लागले.
काल (शनिवारी) नगर येथील बाजार समितीत (Nagar APMC) झालेल्या लिलावात चांगल्या प्रतिच्या कांद्याला ३८०० रुपये पर्यंत प्रतिक्विंटल दर मिळाला. गेल्या वर्षभरातील हा उच्चांकी दर आहे.
नगर जिल्ह्यामध्ये खरीपांसह रब्बी व उन्हाळी कांदा उत्पादनाला शेतकरी प्राधान्य देतात.
गेल्या वर्षी तर कांदा लागवडीने उच्चांक करत एकट्या नगर जिल्ह्यामध्ये वर्षभरात सुमारे सव्वा दोन लाख हेक्टर क्षेत्रावर कांदा उत्पादन झाले. त्यात उन्हाळी क्षेत्र एक लाख ८० हजाराच्या जवळपास होते.
फेब्रुवारी, मार्च मध्ये कांदा काढणी झाली, मात्र तेव्हापासून कांद्याला दर मिळाला नाही त्यामुळे दर मिळेल या आशेने शेतकऱ्यांनी कांदा साठवून ठेवला होता. अगदी दिवाळीपर्यंत अनेक शेतकऱ्यांनी कांदा साठवून ठेवला.
मात्र, दर वाढीची अपेक्षा दिसेना, त्यातच सततचा पाऊस व वातावरणातील बदल यामुळे कांदा खराब होत होऊ लागल्याने अनेक शेतकऱ्यांनी मिळेल त्या दरात कांदा विक्री केली. आता केवळ पाच टक्केही शेतकऱ्याकडे कांदा शिल्लक नाही.