Team Agrowon
सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या रास्त मागण्यासाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर हजारो शेतकऱ्यांची फौज घेऊन मुंबईकडे रवाना झाले आहेत.
अरबी समुद्रात जलसमाधी घेण्याचा गंभीर इशारा त्यांनी दिलेला आहे. दिलेल्या इशारानुसार आज 23 नोव्हेंबर रोजी शेकडो वाहनांचा ताफा आणि हजारो शेतकऱ्यांची फौज घेऊन रविकांत तुपकर मुंबईकडे रवाना झाले आहेत.
जीव गेला तरी बेहत्तर पण शेतकऱ्यांचा हा लढा थांबणार नाही, असा निर्धार रविकांत तुपकर यांनी व्यक्त केलेला आहे आणि त्यानुसार शेतकऱ्यांची फौज घेऊन ते मुंबईकडे कुच करत आहेत.
दरम्यान आता मुंबई मरीन ड्राईव्ह पोलिसांनी देखील तुपकरांना नोटीस पाठविली आहे. अरबी समुद्रात आजपर्यंत असे आंदोलन कोणीच केले नाही, या आंदोलनामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.
तसेच जलसमाधी घेणे हा गुन्हा ठरू शकतो त्यामुळे आपण हे आंदोलन करू नये असे या नोटीस मध्ये नमूद आहे.
बुलढाणा पोलिसांनंतर मुंबई पोलिसांनी देखील नोटीस दिली असून राज्यातल्या सर्व पोलीस स्टेशनची नोटीस आली तरी आता ही शेतकऱ्यांची फौज मागे हटणार नाही.
पोलिसांनी अडवा अडवीचा प्रयत्न केल्यास रक्ताचे पाट वाहतील, असा आक्रमक आणि गंभीर इशारा रविकांत तुपकर यांनी दिला असून ही फौज आता वेगाने मुंबईकडे मार्गक्रमण करत आहे.