Team Agrowon
प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजनेची नंदुरबार जिल्ह्यामध्ये संथगतीने प्रगती सुरू असल्याने योजनेस व्यापक प्रमाणात प्रचार प्रसिद्धी देण्यासाठी चार मोबाईल व्हॅन पुणे येथून पुरविण्यात आलेल्या आहेत.
प्रकल्प मंजुरीची संख्या कमी असणारे तसेच आकांक्षित जिल्हे म्हणजेच नंदुरबार, बीड, हिंगोली व परभणी या चार जिल्ह्यांमध्ये मोबाईल व्हॅनद्वारे प्रचार प्रसिद्धी करण्यात येणार आहे.
मे. अँगल, ॲडव्हर्टायझिंग, पुणे या संस्थेस प्रचार व प्रसिद्धीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
नंदुरबार जिल्ह्यासाठी चार मोबाईल व्हॅन पुणे येथून पाठविण्यात आल्या असून, त्यामध्ये ३० मिनिटांची चित्रफीत दाखविण्यात येणार आहे.
मोबाईल वाहने १३ ते १७ फेब्रुवारी या पाच दिवसांमध्ये जिल्ह्यातील १९ कृषी मंडळांमध्ये प्रत्येकी एक दिवस याप्रमाणे प्रचार प्रसिद्धी करणार आहेत.
यामध्ये लाभार्थी पात्रता निकष, तसेच जिल्ह्यामध्ये वाव असलेल्या अन्नप्रक्रिया उद्योगाबाबत माहिती देण्यात आली आहे. याशिवाय घडी पुस्तिकेचे वाटपही करण्यात येणार आहे.
यावेळी जिल्हा नोडल अधिकारी विजय मोहिते, तालुका कृषी अधिकारी स्वप्नील शेळके, जिल्हा संसाधन व्यक्ती विशाल घरटे, कृषी सहायक उत्सव पाटील व कृषी सहायक अक्षय वसावे आदी उपस्थित होते.