Team Agrowon
अकोला ः जिल्हयात अनेक भागातील शेतकऱ्यांना तुटपुंजी पीकविमा भरपाई मिळत असून संतप्त झालेले शेतकरी हा पैसा कंपनीला परत करू लागले आहेत.
अकोला तालुक्यातील पातूर नंदापूर येथील शेतकऱ्याला मिळाले ४१ रुपये ९५ पैसे भरपाई सोमवारी (ता.२९) जिल्हाधिकारी कार्यालयात विमा प्रतिनिधीकडे परत दिले.
यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, यावर्षी सततच्या अतिवृष्टीमुळे पातूर नंदापूर परीसरात सोयाबीन, तूर व इतर पिकांचे नुकसान झाले होते.
त्यावेळी विमा कंपनीच्या नियनानुसार अनेक शेतकऱ्यांनी ७२ तासांच्या आत विमा कंपनीला सूचना दिली होती.
आता पिकांची भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत असून विमा हप्ता ९२७ रुपये भरलेला असतानाही ४१ रुपये ९५ पैसे इतके देण्यात आले.
हा प्रकार शेतकऱ्यांची थट्टा करणारा आहे. काही शेतकऱ्यांना १०० रुपये तर काहींना ३००० रुपयांची तुटपूंजी भरपाई दिल्या गेली आहे.
या भागात पिक काढणीच्या काळात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावल्या गेला आहे.