Team Agrowon
देशात तांदळाचे भाव वाढल्याने निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन केंद्राने निर्यातबंदीचा निर्णय घेतला. बिगर बासमती पांढऱ्या तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली.
जागतिक पातळीवर आधीच तांदळाचे भाव ११ वर्षांतील उच्चांकी पातळीवर पोचले आहेत. त्यातच भारताने तांदूळ निर्यातीवर बंदी घातली. यामुळे जगाची चिंता वाढल्याचे सांगितले जाते.
जून महिन्यात मध्य आणि दक्षिण भारतात कमी पाऊस पडला. त्यामुळे भात लागवडी रखडल्या. परिणामी लागवडीला उशीर झाला. यामुळे उत्पादकता घटण्याचा अंदाज आहे. तर मागील दोन आठवड्यांपासून पंजाब आणि हरियाना राज्यात जोरदार पावसाने पिकाचे नुकसान होण्याची शक्यता आहे. काही भागात शेतकऱ्यांवर तांदळाची दुबार लागवड करण्याची वेळ आली. यामुळे तांदळाच्या भावात वाढ झाली.
जागतिक तांदूळ निर्यातीत भारताचा वाटा ४० टक्के आहे. त्यामुळे भारताने तांदळाची निर्यात कमी केली तरी त्याचा लगेच परिणाम जागतिक तांदूळ दरावर होत असतो. आधीच रशिया युक्रेन युध्द आणि बदलत्या हवामानामुळे जागतिक तांदूळ दरात वाढ झालेली आहे.
भारतातही तांदळाचे भाव वाढलेले आहेत. पण माॅन्सूनच्या पावसाला उशीर झाल्याने दरात महिनाभरात ३ टक्क्यांची वाढ झाली. त्यामुळे भारताने बिगर बासमती पांढऱ्या तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली आहे.
मागील एक वर्षात देशातील तांदळाचे भाव ११.५ टक्क्यांनी वाढले आहेत. देशात बिगर बासमती पांढऱ्या तांदळाचा पुरेसा पुरवठा असावा आणि किमती स्थिर राहाव्यात यासाठी सरकारने निर्यात धोरणात बदल केला.
भारताने मागील हंगामात एकूण २२० लाख टन तांदळाची निर्यात केली. त्यापैकी १०० लाख टन बिगर बासमती पांढरा तांदूळ होता. म्हणजेच भारताच्या एकूण तांदूळ निर्यातीत बिगर बासमती पांढऱ्या तांदळाचे प्रमाण ४५ टक्के आहे. तर अर्ध उकडलेल्या तांदूळ ७४ लाख टन होता.