Team Agrowon
टोमॅटो दरातील तेजीला व्यापाऱ्यांची नफेखोरी मोठ्या प्रमाणात जबाबदार असल्याचे काही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. घाऊक बाजारात टोमॅटोला प्रतिकिलो ५० ते ६० रुपये भाव मिळत असताना किरकोळ बाजारातील विक्री १५० रुपयांनी कशी होते? असाही प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थितीत केला.
टोमॅटोच्या दरात मागील काही आठवड्यांपासून मोठी वाढ झाली. पण केंद्राने टोमॅटो बाजारात हस्तक्षेप करण्यास सुरुवात केल्यानंतर दरात नरमाई दिसून येत आहे. टोमॅटो दरातील ही नरमाई पुढील काळातही कायम राहून ऑगस्टच्या मध्यापर्यंत टोमॅटोचे भाव ३० रुपये प्रतिकिलोवर स्थिरावतील, असा विश्वास विश्लेषकांनी व्यक्त केला.
मे महिन्यात टोमॅटोचे भाव अगदीच कमी होते. जून महिन्यात टोमॅटोच्या दरात वाढ व्हायला सुरुवात झाली. जूनच्या शेवटच्या आठवड्यात अचानक दरवाढीने झेप घेतली. देशातील सर्वच बाजारात टोमॅटो प्रतिकिलो सरासरी १०० रुपयांच्या पुढे गेला.
टोमॅटो दरातील अचानक येणारे चढ उतार रोखण्यासाठी टोमॅटोचे हरितगृहे आणि इतर आच्छादीत क्षेत्रात नियंत्रित उत्पादन घ्यावे. यामुळे खुल्यावरील टोमॅटो उत्पादनावरील अवलंबित्व कमी होईल. मोकळ्या क्षेत्रावर टोमॅटो पीक घेतल्यास नेहमीच पावसामुळे नुकसानीची चिंता राहील, असे जाणकारांनी सांगितले.
-
आता टोमॅटोच्या दरात काहीशी नरमाई दिसत आहे. टोमॅटोचे दर आणखी कमी होतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. पण टोमॅटोच्या दरात अचानक एवढी वाढ का झाली? आणि अशा अचानक होणाऱ्या वाढीवर उपाय काय? हे प्रश्न कायम आहेत.
पुढील १० दिवसांमध्ये टोमॅटोचे भाव ५० रुपयांपर्यंत कमी होऊ शकतात. त्यानंतर दर सरासरीच्या पातळीवर पोचतील. टोमॅटोच्या ऑफ सिझनमध्ये टोमॅटो प्युरीचा वापर व्हावा, असा उपायही त्यांनी सूचवला. ही प्यूरी फ्रिजमध्ये २० दिवस टिकते, असेही काही उद्योगांचे म्हणणे आहे.
टोमॅटो बाजारातील ही परिस्थिती टाळण्यासाठी तातडीने कीड-रोग आणि बदलत्या हवामानात तग धरणाऱ्या वाणावर संशोधन गरजेचे आहे. तसेच शेतकऱ्यांनाही या परिस्थितीला हाताळण्याचे प्रशिक्षण द्यावे लागेल, असाही आग्रही काही अभ्यासकांनी केला