Anil Jadhao
बाजारात मागील काही दिवसांमध्ये मका दर स्थिरावले आहेत. पोल्ट्री आणि स्टार्च उद्योगांनी मका निर्यातीवर बंदी घालण्याची मागणी केली होती. सरकारने यावर निर्णय घेतलेला नाही, मात्र त्याचा मानसिक परिणाम बाजारावर जाणवत आहे.
यंदा सरकारनं निर्यातबंदी केली तरी दरावर त्याचा फारसा परिणाम होणार नाही. कारण निर्यातबंदीच्या मागणीचा परिणाम आधीच दरावर झाला आहे. मक्याचे दर सरासरी २ हजार ५०० रुपयांवरून नरमले आहेत.
देशातील महत्वाच्या महत्वाच्या मका उत्पादक भागांतील बाजार समित्यांमध्ये सध्या खरिपातील मक्याची आवक वाढत आहे. तसंच यंदा देशातील मका उत्पादन गेल्यावर्षीपेक्षा कमी राहील, असा अंदाज काही संस्थांनी व्यक्त केला.
मागील हंगामात देशात खरिप आणि रब्बी दोन्ही हंगामात ३३६ लाख टन मका उत्पादन झाले होते. मात्र यंदा गेल्यावर्षीपेक्षा कमा उत्पादन ३२० लाख टनांवरच स्थिरावेल, असा अंदाज आहे.
देशातील मक्याचा वापर मात्र वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गेल्या हंगामात देशातील मका वापर २९९ लाख टनांवर होता. तो चालू हंगामात ३०१ लाख टनांवर पोचण्याचा अंदाज आहे.
कमी उत्पादन आणि वाढलेला वापर यामुळं निर्यात कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यंदा भारतातून २८ लाख टन मका निर्यात होईल. मागील हंगामातील मका निर्यात ३४ लाख ५० हजार टनांवर पोचली होती.