महारुद्र मंगनाळे
आजपासून आमचं हायकिंग सुरू झालं.सलग आठ तासाचा डोंगरातील पायवाटांचा प्रवास. एकदा चढण सुरु झाली की,तास तास ती संपतच नाही..आणि डोंगरावरून उतरू लागलो की खोल दरीत उतरल्यासारखं सुरू होतं.
सपाट जमिनीवरचं चालणं अजिबात नाही.भरपूर शारिरीक त्रास आणि मजाही.डोंगरामधून वाहात शिवालय गावाकडं येणाऱ्या नदीच्या थंडगार पाण्याच्या डोहात आम्ही डुबक्या मारल्या.
शिवालय या गावासमोरचा एक उंचच उंच डोंगर चढून आम्ही वर आलोय.साधारण २२००मिटर उंचीवरील डोंगरावर एका नेपाळी कुटुंबाच्या घरी थांबलोय.डाळ- भाताची सोय झालीय. आतापासूनच गारठा जाणवतोय. थंडीचा त्रास होईल असं दिसतंय.
एवढ्या उंचीवर वावरण्याची सवय नसल्याने डोक जाम दुखतंय.आशूतोष बोलला,हे होणारचं.दोन दिवसात सगळं नाॅर्मल होईल असं तो म्हणतोय.,.होईलही तसचं!
एकंदरीत आयुष्यातील हा अशा पध्दतीचा पहिलाच प्रवास आहे.हिमालय स्वप्नं होतं.आता एव्हरेस्ट शिखर चढण्याचा विचार सुध्दा शक्य नाही.मात्र हिमालयाच्या रांगामधून फिरायला मिळतंय हे काही कमी नाही.त्याचा आनंद काही औरच.
सपाट रस्त्यावरून चालणे आणि पर्वत रांगांमधून मैल न गणती चढ-उतार करीत चालणं यात जमीन -अस्मानचा फरक असल्याचं माझ्या लक्षात आलं.मी कुठंही कितीही सहज चालू शकतो हा भ्रम आज दूर झाला. पहिल्याच दिवशी आठ तासात साधारण बारा कि.मी.चा प्रवास प्रचंड थकवणारा होता.शरिराशी संघर्ष करीत करीतच हे चालणं होतं.इथं शरीरासोबत मनाचीही कसोटी असते.तुलनेने आशुतोषला कमी त्रास झाला.त्याला सराव आहे अशा चालण्याचा. अशा प्रवासात रस्त्यात थांबून पोष्टी टाकणं शक्य नाही.शिवाय नेटवर्कचीही अडचण आहे.त्यामुळं या प्रवासाचं तपशीलवार वर्णन नेपाळ डायरीतच येईल.