sandeep Shirguppe
कोल्हापूर जिल्ह्यात मागच्या काही दिवसांपासून पावसाने थैमान घातले आहे. दरम्यान पूढचे दोन दिवस पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
जोरदार पावसाने कोल्हापुरातील राधानगरी धरण भरल्याने पंचगंगा नदीच्या पाणी पातळी वाढ होण्याची भिती व्यक्त करण्यात आली आहे.
दरम्यान मागच्या ४ वर्षात कोल्हापूर जिल्ह्याला महापुराच्या पाण्याने वेढल्याने कोल्हापूर शहरातील पूर बाधीत भागातील इमारतींमधील शेकडो वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.
अशातच यंदाही महापुराचा फटका बसण्याच्या भितीने प्रशासनाने सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. यापार्श्वभूमीवर कोल्हापूर शहरातील पूर बाधित क्षेत्रातील नागरिकांनी आपली वाहने थेट रस्त्यावर लावली आहेत.
शहरातील रमणमळा, महावीर कॉलेज, कलेक्टर ऑफिस, न्यू पॅलेस या परिसरात महापूराचे पाणी मोठ्या प्रमाणात येते. दरम्यान अचानक पुराचे पाणी वाढण्याच्या भितीने नागरिकांनी हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.
महावीर कॉलेज ते रमण मळा येथील रस्त्यावर जवलपास शेकडो वाहने लावण्यात आली आहेत. तसेच या भागात नेहमी वर्दळ असते यामुळे वाहतुक कोंडीचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
याबाबत पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता ते म्हणाले की, आम्ही नागरिकांना वाहने रस्तावर न लावता प्रशासनाने ठरवून दिलेल्या ठिकाणी लावावीत असे आवाहन केले आहे. पोलिसांनी तातडीने ही वाहने हटवण्यास सुरूवात केली आहे.
यासाठी महापालिका आणि जिल्हा प्रशासनाकडून महावीर कॉलेज, अन्य काही वाहनतळे निश्चित करून दिली आहेत. या भागात आपली वाहने लावण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
कोल्हापूर महापालिकेने जवळपास २० ठिकाणे निश्चित केले आहेत. याबाबत कोल्हापूर महापालिकेने वेबसाईटवर ही माहिती प्रसिद्ध केली आहे. त्या ठिकाणी नागरिकांनी आपली जनावरे, वाहने पार्क करावीत असे आवाहन केले आहे.