Team Agrowon
ज्या फळझाडांची लागवड करायची आहे, त्याच्या गरजेनुसार आपल्याकडील उपलब्ध जागेपैकी योग्य क्षेत्राची निवड करावी. जागेची निवड झाल्यावर लागवडीच्या पद्धतीप्रमाणे फळबागेची आखणी करणे गरजेचे आहे. फळपिके लागवडीच्या चौरस, षटकोनी व उतार अशा निरनिराळ्या पद्धती आहेत.
प्रत्येक पद्धतीने १ हेक्टर क्षेत्रातील झाडांची संख्या वेगवेगळी येईल. बहुतेक ठिकाणी फळबागा चौरस पद्धतीने लावतात. या पद्धतीत दोन ओळींतील आणि दोन झाडांमधील अंतर सारखेच असून, ओळी काटकोनात असतात.
मशागतीच्या प्रत्येक फळझाडाचा विस्तार आणि मुळ्यांची वाढ यांचा विचार करून दोन झाडांमध्ये योग्य अंतर ठेवले पाहिजे. प्रत्येक झाडांची योग्य वाढ होऊन फळधारणेसाठी आवश्यक तेवढा सूर्यप्रकाश आणि हवा मिळेल.
आखणीच्या दृष्टीने सोपी व सोईस्कर पद्धत ही चौरस पद्धत असली तरी यामध्ये सुरुवातीच्या काळात बरीचशी जागा निरुपयोगी राहते म्हणून काही ठिकाणी त्रिकोणी किंवा षटकोनी पद्धतीचा वापर करतात. या पद्धतीत दोन झाडांमधील अंतर सर्व बाजूंनी सारखे राहते, त्यामुळे हेक्टरी १५ टक्के झाडे अधिक बसून उत्पादनही अधिक मिळू शकते.
विविध झाडांसाठी शिफारस केलेले अंतर, खड्ड्यांचा आकार व हेक्टरी बसणारी झाडे याचा विचार करावा. अंतराच्या या शिफारशी अनेक प्रयोगानंतर ठरविलेल्या असतात. त्यापेक्षा वेगळ्या प्रमाणात फळझाडांची लागवड केल्यास वाढ आणि उत्पादनावरही अनिष्ट परिणाम होतो
सघन पद्धतीमध्ये लागवड करणार असाल, त्याच्याही शिफारशी आहेत. याचे उत्पादन वाढते हे खरे असले तीर पुढे काही काळानंतर झाडांची छाटणी व अन्य खर्चामध्ये वाढ होते. डोंगर उतारावरील जमिनीवर लागवड करणार असल्यास उताराला आडवे चर खोदून त्यावर लागवड करावी. यालाच ‘कंटूर लागवड’ म्हणतात.
शिफारशीप्रमाणे योग्य अंतरावर आखणी केलेल्या जागांवर खड्डे खोदायचे असतात. योग्य लांबी, रुंदीचे व खोलीचे खड्डे काढावेत. खड्डा खोदताना वरच्या व खालच्या थरातील माती वेगवेगळी टाकावी. खड्डे किमान दोन ते तीन आठवडे तापू द्यावेत. प्रखर सूर्यप्रकाशामुळे खड्ड्यांचे निर्जंतुकीकरण होईल.