sandeep Shirguppe
सातारा जिल्ह्यातील सर्वात मोठे असलेल्या कास पठारावर १ सप्टेंबरपासून फुलांचा हंगाम सुरू होणार आहे.
कास पठार कार्यकारी समितीकडून येणाऱ्या पर्यटकांकडून फुलांचा बहर पाहण्यासाठी दीडशे रुपये शुल्क मोजावे लागणार आहेत.
आता कासवरील पर्यटन आणि फुलोत्सव यंदा खिशाला भारी पडणार आहे. कास पठारावरील फुले पाहण्यासाठी गतवर्षी शंभर रुपये शुल्क होते.
कास पठारावर पार्किंग शुल्क, तसेच इतर कर आकारला जायचा. यामुळे पर्यटकांना अतिरिक्त कर द्यावा लागायचा. यातून पर्यटकांची लूट व्हायची.
परंतु यावर्षीसाठी पार्किंगवरून पठारावर येण्यासाठी असणाऱ्या बसचे शुल्क व पर्यटन शुल्क असे एकत्रित प्रतिव्यक्ती दीडशे रुपये आकारले जाणार आहेत.
याबाबतचा निर्णय कास पठार कार्यकारी समितीच्या बैठकीत नुकताच घेण्यात आल्याचे समितीचे उपाध्यक्ष दत्तात्रय किर्दत यांनी सांगितले.
सध्या पठारावर चवर, पांढऱ्या रंगाची बेंद, पाचगणी आंबरी ही फुले बहरत असून पांढरे चेंडूच्या आकाराचे गेंद फूले दिसू लागले आहे.
श्रावण सुरू झाल्याने पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे विविध रंगी फुलांचा बहर येण्यास सुरुवात होत आहे. यासाठी पंधरा दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता दिसत आहे.
कार्यकारी समितीमार्फत सद्यस्थितीत पठारावर असणारे मंडप गुहा, कुमुदिनी तळे, कास तलाव, न्यू पॉईंटला पर्यटकांना पन्नास रुपये शुल्क आकारून प्रवेश दिला जात आहे.
कास पठारावर फुलांची संख्या कमी झाल्याने अभ्यासकांच्या अभिप्रायानुसार पठाराला असणारी लोखंडी जाळी गतवर्षी काढण्यात आली.