महारुद्र मंगनाळे
गेल्या दहा वर्षांतील असं एकही वर्ष नाही,ज्यावर्षी जेसीबी मशीन बोलवली नाही. ती मशीन पण ठरलेली आहे. तुकाराम बुरसपट्टे यांची.परवाला असाच पिच्छा करून मशीन बोलावली.
मळ्यात जादा पाऊस झाल्यानंतर ज्या ज्या ठिकाणी फुटून माती वाहून जायची,अशा ठिकाणी मुरूम टाकला. एका वावरातील बांध पाण्यानं मोडला होता.तिथंही मुरूम टाकला.विहिरी शेजारच्या छोट्या आंब्याजवळ सहा ट्रॅक्टर मुरूम टाकून त्याला छान ओटा केला.गेटबाहेर लक्ष्मीबागेला बाहेरून केलेलं ग्रीनशेडचं कुंपण वाऱ्याने सतत मोडून पडत होतं.
तिथं चारही बाजूंनी मुरूमाचं कमरेएवढं कुंपण केलं. गेल्या महिन्यात सहा हजार रूपये खाल्लेल्या बोअरवेलमधील केसिंग जेसीबीने काढण्याचा प्रयत्न केला. पंधरा फुटांपैकी जेमतेम तीन फुटांची केसिंग मोडून निघाली.तेवढ्यावर समाधान मानून तो बोअरवेल बंद करून टाकला.
खरं तर,त्याच्या जन्माच्यावेळीच त्याचा मृत्यू झाला होता पण त्याचा अंत्यविधी चार वर्षांनी झाला.कमीत कमी तीन लाख रूपये या बोअरवेलने खाल्ले.त्याचं खऱ्या अर्थाने अस्तित्व संपल्याने,त्या आठवणीही विस्मृतीत जातील.
सीबी मशीन,भाड्याचे दोन ट्रॅक्टर आणि आमचं छोटं ट्रॅक्टर.सगळा१३५०० रूपयांचा हिशोब लगेच पूर्ण केला. सायंकाळी सविता बोलली, दरवर्षी तुम्ही जेसीबी मशीन बोलवताच.. तुम्ही शेतीत आल्यापासून या मशीनवर किती पैसे खर्च झाले असतील?
मी म्हटलं,तुला माहित आहे.मी कुठलाच हिशोब लिहित नाही.त्यामुळं नेमका खर्च नाही सांगता येणार पण तीन लाखांच्या पुढचा तो आहे....मी म्हटलं,आज जेसीबी मशीनने जी कामं केली ती गरजेची होती की नाही. अर्थात नाही असं उत्तर येणं शक्यच नव्हतं.काही आवश्यकच होती . काही भावनिक गरजेची,!