sandeep Shirguppe
महाराष्ट्रात सातारा जिल्हा पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाचा मानला जातो. या जिल्ह्यात बऱ्याच प्रमाणात पर्यटन क्षेत्रे असल्याने हे महाराष्ट्रातील पर्यटनाचे केंद्रबिंदू म्हणून पाहिला जातो.
दरम्यान सातारा जिल्ह्यातील देशातील सर्वात उंच व १ नंबरचा भांबवली वजराई धबधबा (Bhambavli Vajrai Waterfall) आता पर्यटनासाठी सज्ज झाला आहे.
भांबवली वजराई हा धबधबा आजपासून (ता.०८) यावर्षीच्या हंगामाची सुरुवात होत आहे. यामुळे हा धबधबा पाहण्यासाठी मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.
भांबवली वजराई धबधबा परिसर डोंगराळ असून घनदाट झाडी आहे, त्यामुळे पर्यटकांना चालायला कसरत करावी लागते.
विशेष करून वयस्कर पर्यटकांची मागणी होती की, चालण्यासाठी सोईस्कर पायवाट व्हावी. या दृष्टीने वन खात्याने मनावर घेवून जांभ्या दगडाची पायवाट केली आहे.
याअनुषंगाने येथील पर्यटन सोयीस्कर होणार आहे. पर्यटकांना हिरव्यागर्द झाडीतील धुवांधार पावसाचा व धबधब्याचा थ्रिलींग अनुभव घेता येतो.
धुवांधार पावसाच्या सरी, गार-गार वारा, रानकिड्यांचे आवाज, हिरवी गर्द झाडी, धबधब्याच्या पाण्याचा प्रचंड प्रपात, निसर्गाचा खुललेला नजारा पाहून मन प्रफुल्लित होते.
भांबवली वजराई धबधब्याला ५ जानेवारी २०१८ रोजी "क" वर्ग पर्यटन म्हणुन मान्यता मिळाली. त्यानंतर धबधब्याच्या विकासाचे काम चालू झाले.
दरम्यान याठिकाणी तिसऱ्या टप्यातील बाम्बू गेस्ट हाऊसचे काम चालू असून लवकरच पूर्णत्वास जाईल व पर्यटकांना निसर्गाच्या सानिध्यात राहण्याचा आनंद मिळणार आहे.