टीम ॲग्रोवन
शेतीमालाचे उत्पादन आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याच्या उद्देशाने सरकारने चालू पीक वर्षासाठी गव्हाच्या किमान आधारभूत किमतीत (एमएसपी)११० रुपयांनी वाढ करून ती २१२५ रुपये प्रति क्विंटल आणि मोहरीच्या एमएसपीमध्ये ४०० रुपयांनी वाढ करून ती ५४५० रुपये प्रति क्विंटल केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आर्थिक व्यवहारावरील कॅबिनेट समितीच्या (सीसीईओ) बैठकीत एमएसपी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला.
सध्या, सरकार खरीप आणि रब्बी दोन्ही हंगामांत घेतलेल्या २३ पिकांसाठी एमएसपी निश्चित करते.
खरीप (उन्हाळ) पिकांच्या कापणीनंतर लगेचच ऑक्टोबरमध्ये रब्बी (हिवाळी) पिकांची पेरणी सुरू होते.
गहू आणि मोहरी ही प्रमुख रब्बी पिके आहेत.
केंद्र सरकारकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकानुसार सीसीईएने २०२२-२३ पीक वर्ष (जुलै-जून) आणि २०२३-२४ विपणन हंगामासाठी सहा रब्बी पिकांसाठी एमएसपीमध्ये वाढ करण्यास मान्यता दिली.
२०२१-२२ पीक वर्षातील २०१५ रुपये प्रति क्विंटलवरून या पीक वर्षासाठी गव्हाची एमएसपी ११० रुपयांनी वाढवून २१२५ रुपये प्रति क्विंटल करण्यात आली आहे.
यासाठी गव्हाचा उत्पादन खर्च १०६५ रुपये प्रति क्विंटल गृहीत धरण्यात आला आहे.