Team Agrowon
खते जमिनीत १० ते १५ सेंमी खोलीवर द्यावीत. याने पावसाच्या पाण्यात खतांचा ऱ्हास टाळता येतो. तसेच खते मुळांच्या सान्निध्यात आल्याने खतांची कार्यक्षमतादेखील वाढते.
पेरणी झाल्यानंतर पिकाची वाढ जोमाने होण्यासाठी पेरणीच्या वेळी पिकांना खताची पहिली मात्रा द्यावी. या मात्रेमध्ये स्फुरद व पालाश यांची संपूर्ण मात्रा आणि नत्राची अर्धी मात्रा द्यावी. उर्वरित नत्राची मात्रा दोन ते तीन वेळेस पिकाच्या गरजेनुसार विभागून द्यावी.
बहुतांश शेतकरी नत्रयुक्त खतांचा वापर जास्त प्रमाणात करतात. पिकांचा स्फुरद व पालाश यांची गरज भागवली गेली नाही, तर नत्राच्या अतिरिक्त वापरामुळे उत्पादनात कोणत्याही प्रकारची वाढ होत नाही. शाश्वत उत्पन्न मिळण्यास अडथळा निर्माण होतो.
रासायनिक खते पेरणीच्या वेळी द्यावीत, खते बियांपासून फार लांब पडू देऊ नये. त्यासाठी दुचाडी पाभरीचा वापर करणे जास्त फायदेशीर ठरते.
कोरडवाहू जमिनीत पिकांना रासायनिक खते दिल्याने उत्पादनात लक्षणीय वाढ होते. पीक १० ते १५ दिवस अगोदर तयार होते.
जिवाणू संवर्धक हे सर्वांत स्वस्त आणि अत्यंत उपयुक्त, पीक उत्पादनात १५ ते २० टक्के वाढ करणारे आणि उत्पादन खर्चात बचत करणारे आहे. अॅझोटोबॅक्टर हे जिवाणू संवर्धक ज्वारी, बाजरी, ऊस, कापूस, सूर्यफूल या तृणधान्य पिकाला पेरणीपूर्वी एक तास अगोदर १० मिलि अॅझोटोबॅक्टर जिवाणू संवर्धकाची प्रति किलो बियाण्यास प्रक्रिया करावी.
रासायनिक खतांमध्ये इतर खतांच्या तुलनेत युरिया स्वस्त असल्यामुळे युरियाचा वापर सर्वाधिक होतो. त्यामुळे खतांचा संतुलित वापर करणे हाच यावरचा उपाय आहे.