Team Agrowon
भात पिकाचं सरासरी हेक्टरी उत्पादन कमी येण्याची अनेक कारणे आहेत. त्यात सुधारित लागवड पद्धती आणि पीक व्यवस्थापनाचा अभाव ही मुख्य कारणे आहेत. भाताच्या चांगल्या उत्पादनासाठी रोपवाटीकेपासूनच रोपांचे योग्य व्यवस्थापन ठेवण्याची गरज असते. यामध्ये बरेच शेतकरी लागवडीपुर्वी बियाण्यावर बिजप्रक्रिया करत नाहीत त्यामुळेही भात उत्पादनावर परिणाम होतो. जोमदार रोपांसाठी लागवडीपुर्वी रोपांवर बीजप्रक्रिया करण आवश्यक आहे.
सुधारित किंवा संकरित वाणांचे बियाण्याची निवड करणे हे देखील तीतकेच गरजेचे आहे. खात्रीशिर बियाण्यासाठी शासकीय यंत्रणा किंवा कृषी विद्यापीठाच्या विक्री केंद्रातूनच बियाणे खरेदी करावे. लागवडीसाठी सुधारित जातीचे शुद्ध, निरोगी आणि दर्जेदार बियाणे वापरावे. बियाण्यांचे प्रमाण हे पेरणी अंतर, जातीपरत्वे, बियाण्यांचे वजन, आकार यानुसार कमी जास्त होते.
वाफे तयार करताना प्रति गुंठा क्षेत्रास शेणखत २५० किलो, नत्र ५०० ग्रॅम, स्फुरद ५०० ग्रॅम व पालाश ५०० ग्रॅम मातीत मिसळावे. पेरणी ओळीत व विरळ करावी.
रोपवाटीकेत भाताची पेरणी १५ मे ते २५ जूनपर्यंत १ ते १.२० मी. रुंद व ८ ते १० सेंमी उंच गादीवाफ्यावर करावी. एक हेक्टर क्षेत्रासाठी १० गुंठे रोपवाटिका पुरेशी होते.
कडा करपा रोगाच्या नियंत्रणासाठी, स्ट्रेप्टोसायक्लिन ३ ग्रॅम किंवा अॅग्रीमायसीन २.५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून या द्रावणात बियाणे आठ तास भिजवावे. त्यानंतर बियाण्यावर ॲझोटोबॅक्टर २५० ग्रॅम व स्फुरद विरघळविणारे जिवाणू २५० ग्रॅम प्रति १० किलो याप्रमाणे किंचित ओलसर करून चोळावे. बियाणे सावलीत अर्धा तास सुकवून त्वरित पेरणी करावी.
लागवडीपुर्वी बियाण्यावर बीजप्रक्रिया करावी यासाठी १० लिटर पाण्यात ३०० ग्रॅम मीठ विरघळून तीन टक्के द्रावण तयार करुन यामध्ये भात बियाणे बुडवावे. त्यानंतर पाण्यावर तरंगणारे हलके बी काढून नष्ट करावे. भांड्याच्या तळाशी राहिलेले जड बी २ ते ३ वेळा स्वच्छ पाण्याने धुऊन सावलीत वाळवावे. त्यानंतर बुरशीनाशक व जिवाणूनाशकाची बीजप्रक्रिया करावी.
करपा, पर्ण करपा, तपकिरी ठिपके, उदबत्ता आणि आभासमय काजळी नियंत्रणासाठी, प्रतिकिलो बियाण्यांस कार्बेन्डाझिम किंवा बेनलेट ३ ग्रॅम या प्रमाणे चोळावे.