Team Agrowon
पावसाळा सुरू होण्यापूर्वी शेळ्यांना जंतनाशकांच्या मात्रा देणे अत्यंत आवश्यक आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीचा काळ हा जंताची अंडी आणि गोचिड यांच्या वाढीसाठी अत्यंत अनुकूल असतो.
गोचीड शेळ्यांच्या शरीरातील रक्त शोषण करतात. त्यामुळे शेळ्या अशक्त होतात. त्यांच्या अंगावर खाज सुटते. अशावेळी शेळ्या बैचेन होतात, चारा खाणे बंद करतात, त्यांची हालचाल मंदावते. त्यासाठी शेळ्यांच्या अंगावर गोचीडनाशक औषध लावावे.
पावसाळ्यात गोठ्यातील आर्द्रता वाढते. शेळ्या उष्णता सहन करू शकतात. मात्र आद्रता नाही. गोठ्यातील आर्द्रता कमी ठेवण्यासाठी रात्रीच्या वेळी शेगडी किंवा ६० वॉटचा बल्ब लावून उष्णता निर्माण करावी.
गोठ्यातील जमीन ओली राहिल्यामुळे शेळ्यांच्या पायांच्या खुरांमध्ये ओलसरपणा राहून पायाला फोड येतात. त्यामुळे शेळ्या लंगडतात, ताप येतो, चारा कमी खातात आणि अशक्त होतात. योग्य वेळी उपचार न केल्यास शेळ्या दगावण्याची शक्यता असते. गोठ्यातील मलमूत्र दररोज बाहेर काढून गोठा कोरडा ठेवावा.
पडत्या पावसामध्ये शेळ्यांना बाहेर चरायला सोडू नये. पावसात भिजल्यामुळे शेळ्यांना न्यूमोनियासारखा आजार होण्याची शक्यता असते. यामुळे शेळ्या शिंकतात, नाकातून चिकट पांढरा पिवळसर द्रव वाहतो, ताप येतो, धाप लागते इ. लक्षणे दाखवितात.
पावसाळ्यात उगवलेला कोवळा हिरवेगार गवत शेळ्या अधिक प्रमाणात खाणार नाहीत याची काळजी घ्यावी. अशा चाऱ्यामध्ये तंतुमय पदार्थ कमी असतात, त्यामुळे अपचन, पोटफुगी, हगवण असा त्रास उद्भविण्याची शक्यता असते.
शेळ्या व करडांना आंत्रविषार, फुफ्फुसदाह, लाळ्या खुरकूत, घटसर्प व फऱ्या या आजारांचे प्रतिबंधात्मक लसीकरण करून घ्यावे.