Team Agrowon
शेतजमिनीतून वाहणारे पावसाचे पाणी एकत्रितपणे वळवून विहिरीजवळ आणावे. या पाण्याचा उपयोग विहीर पुनर्भरणासाठी करावा. मात्र हे पावसाचे वाहणारे पाणी सरळ विहिरीत सोडू नये, कारण वाहणाऱ्या पाण्यात माती गाळमिश्रण असते. जर असे पाणी सरळ विहिरीत सोडले तर विहिरीत गाळ साठत जातो.
विहीर पुनर्भरण तंत्रामध्ये दोन प्रकारच्या गाळण यंत्रणा आहेत. यामुळे पावसाच्या पाण्याबरोबर येणारा गाळ अडविला जातो. शुद्ध पाणी विहिरीत सोडले जाते. त्यामुळे आपल्या शेताच्या रचनेनुसार पावसाचे वाहते पाणी गाळण यंत्रणेकडे वळवावे.
शेतातील पाणी सरळ टाक्यात घेण्याएवजी टाक्याबाहेर एक साधा खड्डा करून त्यात दगड, गोटे, रेती भरावी. त्यातून एक पीव्हीसी पाइपने पाणी प्रथम प्राथमिक गाळण यंत्रणेत घ्यावे. शेताकडील चारीद्वारे वाहणारे पाणी प्रथम प्राथमिक गाळण यंत्रणेत घ्यावे.
मुख्य गाळण यंत्रणेच्या अलीकडे १.५ मीटर बाय १ मीटर बाय १ मीटर आकाराची दुसरी टाकी बांधावी. त्याला प्राथमिक गाळण यंत्रणा म्हणतात. शेतातून वाहत येणारे पाणी प्रथम या टाकीत घ्यावे. तेथे जड गाळ खाली बसतो, थोडे गढूळ पाणी पीव्हीसी पाइपच्या माध्यमातून किंवा खाचे द्वारे मुख्य गाळण यंत्रणेत सोडावे.
विहीर पुनर्भरण मॉडेलच्या दुसऱ्या भागाला मुख्य गाळण यंत्रणा असे म्हणतात. ही यंत्रणा विहिरीपासून २ ते ३ मीटर अंतरावर बांधावी. यासाठी २ मी. लांब x २ मी. रुंद आणि २ मी. खोल खड्डा करावा. याला आतून सिमेंट विटांचे बांधकाम करून टाकीसारखे बांधून घ्यावे.
मुख्य गाळण यंत्रणेच्या खालील भागातून चार इंच व्यासाचा पीव्हीसी पाइप विहिरीत सोडावा. या टाकीत ३० सें.मी. उंचीपर्यंत मोठे दगड, नंतर ३० सें.मी. उंचीपर्यंत छोटे दगड आणि त्यावर ३० सें.मी. जाडीचा वाळूचा थर टाकावा. असे ९० सें.मी. जाडीचे गाळण थर असावे. त्यावरील ६० सें.मी. भागात पाणी साठते. या गाळण यंत्रणेमार्फत पाणी गाळले जाऊन विहिरीत सोडले जाते. अशा प्रकारे विहीर कुपनलीकेचे पुनर्भरण केल्यास पाणीटंचाईवर मात करणे शक्य होते.