Team Agrowon
धार्मिक भावनेने उपवास करताना शारीरिक आरोग्यही जपले गेले पाहिजे. उपवासामुळे काही प्रमाणात अनारोग्य निर्माण होऊ शकते. अशा वेळी नेमकी काय काळजी घ्यावी आणि उपवास करताना काय सेवन करावे ज्याचा त्रास होणार नाही याची माहिती असावी लागते.
उपवासाचे पदार्थ म्हटले की साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडा, वेफर्स, चिवडा, वरई (भगर), दाण्याची आमटी, तळलेले पदार्थ इत्यादी सर्व पदार्थ खाल्ले जातात.
या पदार्थांऐवजी उपवासाला चालणाऱ्या भाज्या खाव्यात. लाल भोपळा, भेंडी, काकडीची भाजी यामुळे त्रासही होत नाही आणि पोटही भरते.
साबुदाण्याची खिचडी सारखी खाल्ल्यास पोटात दुखू शकते. गॅसेस, बद्धकोष्ठता होऊ शकते. वेफर्स चिवडा जास्त प्रमाणात सेवन केल्यास घसा दुखणे, खोकला येणे असे त्रास होतात.
वऱ्याचे तांदूळ उष्ण असतात. त्यामुळे प्रमाणात खावेत. नाहीतर त्याने जळजळ, छातीत आग होणे, डोळ्यांची आग अशी लक्षणे उद्भवू शकतात.
दाण्याची आमटी पित्तकारक असते. त्यामुळे शक्यतो टाळलेली बरी! त्याऐवजी गोड ताक, गरम दूध घ्यावे. दही, आंबट ताक घेऊ नये. पाणी भरपूर प्यावे.
उपवासाचे थालिपीठ, साबुदाण्याची लापशी किंवा साबुदाणा भिजवून शिजवून त्यात जिरेपूड मीठ घालून खावे. त्याने त्रास होत नाही.