Radhika Mhetre
शेतात सिंचनासाठी वापरावयाच्या पाण्याची प्रत ही त्यामध्ये असणाऱ्या विद्राव्य क्षारांचे प्रमाण, सामू, सोडिअमचे अधिशोषित गुणोत्तर, अवशेषात्मक सोडिअम कार्बोनेट, क्लोराइड्स, बोरॉन, नायट्रेट नायट्रोजन इ. रासायनिक गुणधर्मावर अवलंबून असते.
पाण्याच्या पृथक्करणासाठी अर्धा लिटर पाणी नमुना पुरेसा होतो. पाण्याचा नमुना स्वच्छ प्लॅस्टिकच्या अथवा काचेच्या बाटलीत घ्यावा.
विहिरीतून पाण्याचा नमुना घेताना विहिरीच्या मध्य भागातील पाणी बादलीच्या साह्याने ढवळून काही बादल्या पाणी बाहेर उपसून टाकल्यानंतर पाण्याचा नमुना घ्यावा. कूपनलिकेतील पाणी घेताना १० ते २० मिनिटे एकसारखी कूपनलिका चालून नंतर स्वच्छ प्लॅस्टिक अथवा काचेच्या बाटलीत पाणी नमुना घ्यावा.
नदी, ओढे, कालवा यांच्यामधील पाण्याचा नमुना घेताना वाहत्या पाण्यामधून मध्य भागातील नमुना घ्यावा.
नमुना बाटलीत भरण्यापूर्वी बाटली त्या पाण्याने दोन ते तीन वेळा विसळून घ्यावी. घट्ट बूच बसवून २४ तासांच्या आत प्रयोगशाळेत पृथक्करणासाठी पाठवावा.
बाटलीसोबत शेतकऱ्याचे नाव व नमुना कशातून घेतला याबाबतची सविस्तर माहिती लिहिलेले लेबल बाटलीला लावावे.
पाण्याचा प्रातिनिधिक नमुना घेतल्यानंतर पृथक्करण अहवालानुसार सामू (आम्ल-विम्ल निर्देशांक) सर्वसाधारण किंवा विम्लधर्मी आहे कळते.