Team Agrowon
मृग बाग लागवड मे महिन्याचा शेवटच्या आठवड्यात किंवा जून महिन्यात करावी. लागवड गादीवाफ्यावर करावी. लागवडीसाठी निरोगी बागेतील कंद निवडावेत. लागवडीपूर्वी शिफारशीप्रमाणे कंद प्रक्रिया करावी.
मागील वर्षी जून महिन्यात लागवड केलेल्या केळी बागांवर सीएमव्ही रोगाचे प्रमाण काही भागांत अगदी नगण्य होते. तर काही बागा पूर्णतः रोगमुक्त होत्या.
मात्र जुलै-ऑगस्ट महिन्यांत लागवड केलेल्या बागांवर रोगाचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात दिसून येत होता. काही ठिकाणी बागेतील सर्व झाडे उपटून नष्ट करण्याशिवाय दुसरा उपाय नसल्याचे दिसून आले.
केळी पिकाची लागवड ही गादीवाफ्यावर करावी. गादीवाफ्यावर लागवड केल्यामुळे मुळांची वाढ चांगली होऊन झाडांची वाढ चांगली होते. त्यामुळे साहजिकच घडांची वाढ चांगली होऊन ते वजनाने देखील अधिक भरतात.
वेळोवेळी बागेत हलकी टिचणी करून झाडांना भर देत राहावे. त्यामुळे वादळी वाऱ्यामुळे झाडे पडण्याचे प्रमाण कमी होते.
रोग व्यवस्थापनामध्ये लागवडीचे अंतर ही अत्यंत महत्त्वाची बाब असते. केळी फळपिकात ‘श्रीमंती’ व ‘फुले प्राइड’ यांसारख्या बुटक्या वाणांची लागवड दीड बाय दीड मीटर (१.५ मीटर बाय १.५ मीटर) अंतरावर करावी. तर ‘ग्रॅडनैन’ या उंच वाढणाऱ्या वाणाची १.७५ मीटर बाय १.७५ मीटर अंतरावर लागवड करावी.
योग्य अंतरावर लागवड केल्यामुळे बागेत हवा खेळती राहून बाग निरोगी राहण्यास मदत होते. दाट लागवडीमुळे (शिफारशीपेक्षा कमी अंतरावर) सिगाटोका व सीएमव्ही रोगाच्या प्रादुर्भावास अनुकूल वातावरण निर्मिती होते.