Team Agrowon
लाल मिरचीसाठी देशभरात प्रसिद्ध असलेल्या नंदुरबारच्या बाजारात यंदा आवकही अधिक राहिली. तसेच सरासरी दरही पाच हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत होते. मिरचीची आवक सध्या अल्प आहे. यंदाचा हंगाम मात्र शेतकऱ्यांसाठी बऱ्यापैकी राहिला, असे चित्र आहे.
नंदुरबारात मिरचीची लागवड यंदा सुमारे अडीच हजार हेक्टरवर स्थिर होती. मागील हंगामात लागवड सुमारे दीड हजार हेक्टरवर होती. तसेच उत्पादनही कमीच राहीले. यंदा हिरव्या मिरचीचेदेखील चांगले उत्पादन हाती आले.
हिरव्या मिरचीची थेट खरेदी अनेक खरेदीदारांनी करून तिची आखातात पाठवणूक केली. एकरी २०० ते २५० क्विंटल एवढे हिरव्या मिरचीचे उत्पादन अनेकांनी मिळविले. हिरव्या मिरचीला सरासरी ३५ ते ३८ रुपये प्रतिकिलोचा दर मिळाला.
सुरुवातीला काहींना ४० ते ४२ रुपये प्रतिकिलोचा दरही मिळाला. मध्यंतरी दर २५ रुपये प्रतिकिलो, असेही होते. हिरव्या मिरचीची काढणी ऑगस्ट ते फेब्रुवारीदरम्यान सुरू होती. यानंतर ओल्या लाल मिरचीला दर चांगले होते. हे दर प्रतिक्विंटल कमाल १० हजार रुपये एवढा होता.
अनेक शेतकऱ्यांनी हिरव्या मिरचीची काढणी बंद करून ओल्या लाल मिरचीसाठी क्षेत्र राखले. मागील हंगामात ओल्या लाल मिरचीला प्रतिक्विंटल कमाल पाच व किमान दोन हजार रुपये दर होता.
ओल्या लाल मिरचीची पाठवणूक नंदुरबार बाजार समितीत शेतकऱ्यांनी केली. बाजारात मार्चमध्ये ही आवक चांगली राहिली. ही आवक मार्चमध्ये प्रतिदिन सरासरी १० ते ११ हजार क्विंटलवर होती. आठवड्यातून तीन दिवस ही आवक अधिक राहायची. एप्रिलमध्ये आवक कमी होत गेली.
यंदा मात्र दर चांगले मिळाले. फेब्रुवारीत ओल्या लाल मिरचीचा हंगाम सुरू झाला. मार्च व एप्रिलमध्ये ओल्या लाल मिरचीचा हंगाम जोमात सुरू होता. नंदुरबारात सुमारे १३ खरेदीदारांनी ओली लाल मिरची वाळविण्यासाठी पथारी किंवा मोठे खळे तयार केले होते.