Team Agrowon
हिरवळीच्या पिकांच नियोजन करताना मातीत आर्द्रता, खतासाठी लागणारा वेळ या गोष्टी लक्षात घेऊन शेंगवर्गीय पिकांची निवड करावी.
मृगाचा पहिला पाऊस पडल्यावर हिरवळीच्या पिकांची पेरणी करणं योग्य मानलं जातं. मात्र ही वेळ प्रदेशनिहाय वेगळी असू शकते.
पुरेशा आद्रतेमध्ये बियांची उगवण चांगली होते. यानंतर सर्वसाधारणपणे पीक फुलात आल्यावर ती गाडावीत. यासाठी पेरणीनंतर साधारणपणे ६ ते ८ आठवडे लागतात.
हिरवळीची पिके गाडल्यानंतर मुख्य पिकांची पेरणी यातील कालावधी आणि मातीत गाडलेल्या पिकांना कुजवण्यासाठी किती वेळ लागतो, यावर मुख्य पिकांची पेरणी करण्याचे नियोजन कराव.
जाडसर, रसाळ देठ व पाने कुजण्याला कमी वेळ लागतो. मातीचा पोत व आर्द्रता ही सुद्धा महत्त्वाची आहे. हलक्या मातीमध्ये योग्य आर्द्रता असताना हिरवळीचे खत गाडल्यानंतर ७ ते १२ दिवसांनी पेरणी करावी.
पिकांच्या भरघोस वाढीसाठी लागणारे मुख्य अन्न घटक व इतर सूक्ष्म अन्नद्रव्ये हिरवळीच्या पिकांच्या कुजण्यातून मातीत उपलब्ध होतात. ही प्रक्रिया मातीच्या रासायनिक, भौतिक, जैविक पातळीवर अवलंबून असते.
सर्वसाधारणपणे १ टन हिरवळीचे किंवा शेंगवर्गीय पिकापासून बनलेले खत हे २.८ ते ३ टन शेणखत किंवा ४.५ ते ४.७ किलो नत्र किंवा १० किलो युरियाच्या बरोबर असते. म्हणजेच २४ ते ३० किलो नत्राचा पुरवठा करण्यासाठी ६ टन हिरवळीचे खत प्रति हेक्टरी वापरावे लागते.