Team Agrowon
शेततळ्यामुळे संरक्षित पाणी देणे शक्य असल्याने पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमामध्ये शेततळ्याची उपाययोजना महत्त्वाची समजली जाते. याप्रमाणेच नैसर्गिक नाला अथवा ओढ्यावर आडवा बंधारा बांधून आणि पाणलोटक्षेत्रातून गोळा होणारा प्रवाह अडवून पाझर तलाव बांधता येतो.
पाझर तलाव हा सच्छिद्र भूभागावर बांधला, तरच त्याचे फायदे मिळू शकतात. म्हणून पाझर तलाव हा एखाद्या भारी अथवा अभेद्य जमिनीवर बांधू नये, ज्यामुळे पाझर तलावाच्या मुख्य कार्याला अडथळा होईल.
पाझर तलाव अशा ठिकाणी बांधावा, ज्याठिकाणचा जमिनीचा वरचा थर सच्छिद्र असेल आणि त्याखालच्या कमीत कमी तीन मीटर जाडीचा थर हा जास्तीत जास्त झिजलेला असेल. अशा प्रकारच्या जमिनीवर बांधलेल्या तलावामुळे भूजल पुनर्भरणाचा वेग वाढतो. पाझर तलावाच्या खालच्या बाजूला अथवा परिणाम क्षेत्रात पिकायोग्य जमीन मोठ्या प्रमाणात असणे आवश्यक आहे. अशी मोठ्या प्रमाणातील शेतजमीन असल्याने पाझर तलावाचा जास्तीत जास्त उपयोग करून शक्य होते.
त्याचप्रमाणे या भागात अनेक विहिरी असणे किंवा नवीन विहिरी खोदण्यालायक क्षेत्र असणे गरजेचे आहे, जेणेकरून त्या भागाला सिंचनाखाली आणणे सहज शक्य होईल. लहानात लहान पाझर तलावाच्या क्षेत्राची लांबी एक किमी असते.
पाझर तलावामध्ये जास्त होणारे पाणी काढून टाकण्यासाठी सांडव्याची साधी, आर्थिकदृष्ट्या परवडणारी आणि कार्यक्षम व्यवस्था करता आली पाहिजे.
पुरेशा सच्छिद्र जमिनीवर पाझर तलाव बांधताना तो एखाद्या खोल दरीसारख्या भागात बांधावा, जेणेकरून खोल तळे तयार होईल. पाणी कमीत कमी क्षेत्रावर पसरेल. उथळ तळ्यापेक्षा असे खोल तळे तयार केल्याचे दोन फायदे आहेत.
एक म्हणजे ऊन-वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात होणारे पाण्याचे बाष्पीभवनाचे प्रमाण कमी होते आणि कमीत कमी जमीन पाण्याखाली बुडते. दुसरा फायदा म्हणजे तलावातील पाणी अडविण्याकरिता निवडलेले क्षेत्र जर पुरेसे सच्छिद्र नसेल तर त्याचे साठवण क्षेत्र वाढवावे, ज्यायोगे अधिक पाणी जमिनीत मुरू शकेल.