Team Agrowon
बऱ्याचदा माळरानावर चरताना जनावरे चाऱ्यासोबतच प्लास्टिक सारखे अखाद्य पदार्थ खातात. मोकाट जनावरांसह कधीकधी घरच्या गोठ्यातील जनावरेही प्लास्टिक खातात.
जर तुमच्याही गोठ्यातील गायींनी किंवा अन्य जनावरांनी प्लास्टिक खाल्ले असेल, तर तुम्ही त्वरित काही प्राथमिक घरगुती उपाय करू शकता.
या घरगुती उपायांमुळे जनावरांने खाल्लेले प्लास्टिक नैसर्गिकपणे बाहेर पडण्यास मदत होते. यासाठी तुम्हाला एक विशिष्ठ प्रकारचे मिश्रण तयार करावे लागेल.
हे मिश्रण तयार करण्यासाठी १०० ग्रॅम मोहरी तेल, १०० ग्रॅम तीळ तेल, आणि १०० ग्रॅम कडुलिंबाचे तेल घ्या.
यामध्ये १०० ग्रॅम एरंडी तेल आणि ५०० ग्रॅम गायीच्या दुधापासून तयार केलेले ताकही मिसळा.
आता या मिश्रणामध्ये ५० ग्रॅम तुरटी आणि ५० ग्रॅम सैंधव मीठ बारीक पावडर आणि २५ ग्रॅम मोहरी टाकून द्रावण तयार करून घ्या.
तयार झालेले हे द्रावण प्लास्टिक खाल्लेल्या जनावराला तीन दिवस पाजत राहा. तसेच यासोबत जनावराला हिरवा चाराही खायला द्या.
या द्रावणात एरंडी तेल घातल्यामुळे जुलाबावाटे प्लास्टिक पडून जाईल. तसेच मोहरीमुळे रवंथ करताना तोंडातून बाहेर पडेल.
हा उपाय प्राथमिक स्वरूपात जनावराने प्लास्टिक खाल्ल्याचे निदर्शनास आल्या आल्या करावा. मात्र, खूप कमीवेळा हा उपाय प्रभावी ठरतो. यासाठी पशुपालकाने पशुवैद्यकाकडून सल्ला घेवून त्वरित उपचार सुरू करावेत.