मनोज कापडे
धान्य, वनोपज, पशुपालन, मत्सपालनासह सर्व प्रकारच्या शेतीमालाला कायमस्वरूपी हमीभाव देणारा कायदा मंजूर होण्यासाठी देशभर पुन्हा शेतकरी आंदोलन उभारण्याचा निर्धार ‘एमएसपी गॅरंटी किसान मोर्चा’ने केला आहे.
त्यासाठी शेतकऱ्यांच्या २४३ संघटना एकत्र आल्या आहेत. हमीभाव कायद्यासाठी किसान मोर्चाने देशभर कार्यशाळा आयोजित केल्या आहेत. त्यातील पहिली कार्यशाळा गुरुवारी (ता. १) पुण्यात झाली.
एमएसपी गॅरंटी किसान मोर्चाचे अध्यक्ष व्ही. एम. सिंग, मुख्य मार्गदर्शक स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, तसेच शेकापचे नेते जयंत पाटील, विधिज्ञ असीम सरोदे, विश्वंभर चौधरी, कर्नाटकचे चंद्रशेखर कुडीहळ्ळी, शेकापचे नेते व्ही. एस. जाधव उपस्थित होते.
श्री. सिंग म्हणाले, “पाच ट्रिलियनची अर्थव्यवस्था करण्याची गप्पा पंतप्रधान नरेंद्र मोदी मारतात. मात्र शेतीकडे दुर्लक्ष असल्याने ते शक्य नाही. दिल्लीत यापूर्वी एक शेतकरी आंदोलन झाले. पण आता दोन लाख शेतकरी गोळा केले तरी काहीही उपयोग होणार नाही.
त्यामुळे आपल्याला हमीभाव कायद्यासाठी गावागावांत लढा द्यावा लागेल. येत्या लोकसभा निवडणुकीत मत हवे असल्यास हमीभावाचा कायदा द्या, अशी आग्रही मागणीदेखील आपल्याला करावी लागेल.
परंतु आता माघार घ्यायची नाही. पंतप्रधानांना मागण्यांची पत्रे २३ मार्चला शहीददिनी देऊ आणि पुन्हा एक माहोल तयार करू.’’