Anil Jadhao
खरीप हंगामात सातत्याने पावसामुळे नुकसान झाले होते. प्रामुख्याने पीक काढणीच्या अवस्थेत झालेल्या पावसाने हंगामाची माती केली.
पीकवाढ व उत्पादन घरात यायच्या काळात सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टी, संततधार पाऊस पडला. यामुळे ६० टक्क्यांवर हंगाम वाया गेला.
शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची अद्याप प्रतीक्षा आहे. दोन महिन्यांत सुमारे २६२ कोटी रुपयांचे नुकसान झालेले असून, याचा अहवाल वरिष्ठांकडे गेलेला आहे.
अकोला जिल्ह्यात सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात पावसाने ९१ हजार ४०४ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले होते. नुकसानीपोटी मदत म्हणून जिल्हा प्रशासनाने शासनाकडे १४२ कोटी ९६ लाख ८ हजार ८८४ रुपयांची मागणी केली होती.
ऑक्टोबर महिन्यातही जोरदार पाऊस झाल्याने नुकसानाचे तलाठी, कृषी सहायक व ग्रामसेवकांमार्फत संयुक्त पंचनामे झाले. ऑक्टोबर महिन्यात सततच्या पावसामुळे व अतिवृष्टीमुळे ११९ कोटी ६२ लाख २९ हजार ३४४ लाख रुपयांचे नुकसान झाले.
मदतीसाठी जिल्हा प्रशासनाने ११९ कोटी ६२ लाख २९ हजार ३४४ रुपयांची मागणी शासनाकडे केली आहे. आता नागपूर हिवाळी अधिवेशनाची लगबग सुरू झाली आहे. या अधिवेशन काळात तरी मदत मिळेल अशी अपेक्षा होत आहे.