Irrigation : कल्पकतेतून केली सिंचनाची व्यवस्था

Anil Jadhao 

तोरणा किल्ल्याच्या घेऱ्यात असलेल्या वेल्हे गावातील पश्चिम बाजूला तोरणाचा पर्वताची एक धार उतरते. या धारेला दस्तान असे नाव आहे. या डोंगरावर एक शिवकालीन जिवंत झरा आहे. झऱ्याच्या खालच्या दिशेला महिंद्र जगन्नाथ गायकवाड व त्याचे चुलते विश्वनाथ बाबुजी गायकवाड यांची शेती आहे.

पाणी नसल्यामुळे डोंगरावरील दोन्ही गायकवाड परिवार शहरात येऊन कुटुंबासाठी आर्थिक जुळवाजुळव करीत असतात. मात्र, झऱ्यातील पाण्याचा काय वापर करता येईल, याचा विचार दोघांनी सुरुच ठेवला होता.

चार वर्षांपूर्वी  या झऱ्याखाली चुलत्यांनी कष्टपूर्वक एक तळे खोदून घेतले. १५ फुट रुंद व १५ फुट लांबीच्या या तळ्याला ८ फुटाची खोली ठेवली होती. त्यात पाणी साचू लागले. मात्र, खोदलेल्या तळ्यातील पाण्याचा उपयोग शेतीला उपयोग करता येत नव्हता.

वीज, पंप, महागडी जलवाहिनी असे सारे त्यासाठी हवे होती. त्यामुळे काही वर्षे तळे असेच पडून होते. गेल्या वर्षी महिंद्रने युक्ती लढवली व अवघ्या २० हजार रुपये खर्चाचा एक छोटा सिंचन प्रकल्प शेतात राबविण्याचा निर्धार केला.

महिंद्रने तळ्यापासून शेती व घरापर्यंत विजेविना पाणी नेण्याचे ठरविले. त्यानुसार, कमी खर्चात रबरी पाइप आणून तळ्यातील पाणी दीडशे फुटावरील २००० लिटरच्या एका प्लॅस्टिकच्या टाकीत आणले. तेथून पुन्हा ५० फुटावर एक ५०० लिटरच्या टाकीत पाणी नेले. या टाकीपासून शेतघराला थेट गुरुत्व पध्दतीने पाणी नेले.

डोंगरात शेतघर असूनही विजेविना घरातील नळाला २४ तास पिण्याचे पाणी मिळू लागले. घराला पाणी पुरवठा करणाऱ्या छोट्या टाकीचा कॉक बंद केल्यानंतर मोठ्या टाकीतून थेट तुषार संचाद्वारे शेतात पाणी नेण्याची युक्ती महिंद्रने यशस्वी केली.

cta image