Mukund Pingale
राज्यात मोठ्या उत्साहात गणरायाचं महाराष्ट्रातील प्रत्येक घरात आगमन झालेले आहे. या मंगलमयप्रसंगी प्रत्येक जण सुखदुःख विसरून गणरायाची स्थापना आपल्या घरात करत असतो.
शेतकऱ्यांच्या या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी नैताळे (ता.निफाड) येथील शेतकरी संजय साठे यांनी उन्हाळ कांद्यापासून गणेश मूर्ती तयार करून मूर्तीची घरात प्रतिष्ठापना केली आहे.
शेतमालापासूनही आपण जगण्याचा उत्सव साजरा करू शकतो हा या मागचा विचार होता. ग्राहकांनी सुद्धा कांद्याला त्या नजरेने पाहणे गरजेचे आहे, असं साठे म्हणाले.
अन्नाला देवाच्या स्वरूपात पाहण्याची आपली संस्कृती आहे. याच धर्तीवर आम्ही शेतकरी कांद्याला देवच मानतो. जसं लक्ष्मीपूजनाला पैशाच्या अगोदर कांद्याला पुजतो; त्याचप्रमाणे गणेशोत्सवाप्रसंगी कांद्यापासून गणपती बनवून त्याची विधिवत प्राणप्रतिष्ठा केल्याचे शेतकरी साठे यांनी सांगितले.
राज्यकर्त्यांना सद्बुद्धी देऊन शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष द्यावे. दिवसेंदिवस महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या वाढत आहे. त्या थांबविण्यासाठी शासनाने प्रयत्न केले पाहिजे, असे साठे यांनी सांगितले.
कांदा पिकासाठी कायमस्वरूपी आयात निर्यात धोरण ठरवून त्यानुसार निर्यात आयात करून शेतकऱ्यांना व देशातील ग्राहकांना योग्य दरात अन्नधान्य मिळावे. कायमस्वरुपी तोडगा काढला पाहिजे. यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे, असंही साठे यांनी सांगितले