Team Agrowon
केळीची पूर्वी पारंपरिक पद्धतीने लागवड केली जायची. त्यात कंदांचा अधिक उपयोग व्हायचा. पाट पद्धतीने सिंचन, पीक फेरपालट न करणे, खतांचा माती परीक्षणाशिवाय वापर, पाण्याचा असंतुलित वापर अशा प्रकारचे व्यवस्थापन होते. त्याचा जमीन सुपीकतेवरही परिणाम होत होता. पर्यायाने केळीच्या उत्पादनावर परिणाम झाला.
गुणवत्तेचा प्रश्न होता. केळीला हवे तसे दर मिळत नव्हते. मग केळीची लागवड स्थिर ठेवून एकरी उत्पादकता वाढविण्यावर गावातील प्रयोगशील शेतकऱ्यांनी भर दिला. अनेक केळी उत्पादकांनी अभ्यास दौऱ्यांत भाग घेत सुधारित व्यवस्थापन जाणून घेतले.
पीक फेरपालट, काटेकोर सूक्ष्मसिंचन, उतिसंवर्धित रोपांचा वापर, फ्रूट केअर तंत्र आदी तंत्रज्ञान शेतकऱ्यांनी आत्मसात करण्यास सुरुवात केली. त्याचे परिणाम दिसू लागताच गावातील तरुण, अभ्यासू शेतकऱ्यांनीही तसे प्रयोग सुरू केले.
पूर्वी फक्त कांदेबाग (सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये लागवडीच्या बागा) केळीची अधिक लागवड व्हायची. तीही एकाच महिन्यात न करता दोन टप्प्यांत व्हायची. यातून जोखीम कमी करण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न होता.
फुलकिडीला रोखण्यासाठी निसवणीनंतर बड इंजेक्शन, फ्लोरेट काढणे, बागा स्वच्छ ठेवणे, करपा निर्मूलनासाठी सामूहिक व्यवस्थापन, रसायन अवशेषमुक्त केळी उत्पादनासाठी शिफारस केलेल्या कीडनाशकांचा वापर, घडांना स्कर्टिंग बॅगेचा वापर, केळीचे अवशेष शेतात गाडणे आदी बाबींचा वापर सुरू झाला.
एकूण व्यवस्थापनातून केळीची पूर्वी मिळणारी १४ ते १५ किलोची रास आता २५ पर्यंत मिळू लागली आहे. केळीसाठी पपई, काबुली हरभऱ्याचा बेवड लाभदायी असतो. हे लक्षात घेऊन तशा प्रकारे पीक नियोजन होऊ लागले. आजमितीला साडेपाच लाखांपर्यंत एकूण उतिसंवर्धित केळी रोपांची लागवड गावात दरवर्षी होत असावी.
मागील तीन वर्षे किमान ९००, कमाल १७०० व सरासरी १२०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. थेट शिवार खरेदी केली जाते. आखाती देशांसह उत्तर भारतात केळीची पाठवणूक केली जाते.