Team Agrowon
इथल्या खेड्यांची सकाळ भजन, कीर्तन, आरत्या, प्रवचने यांच्याच सात्त्विक आवाज आणि शब्दांनी झाली. गायी-म्हशींच्या घंटाघुंगरांचे स्वर आणि सकाळच्या कामांची धामधूम, बाया-माणसांच्या धावपळीमधून गावं जागी झालेली.
अगदी सर्वत्र आढळणारी शेतांतील कामांची लगबग. पेरणीपूर्व मशागती, धूळपेर किंवा वावरांच्या डागडुजी.
घराभोवतीच्या रस्त्यांची कामं. दिवाबत्तीची तयारी. खतं, बियाणं, औषधांची खरेदी. अशातच, पालख्यांची जत्रा आणि ‘वारीचे वारे’ संथ, शांत, अगदी सात्त्विक वाहणारे... गाव-शिवारांवर प्रसन्नतेची सर्वत्रच सावली. आनंदाचा महापूर. श्रीविठ्ठलाचा दाही दिशा भरून राहिलेला गजर.
दिंडीत सामील हा व्हायची तयारी. वय सारं विसरून सारेजण भाविकतेने दिंड्यांत सामील... अमृत गोडीचा ‘ग्यानबा तुकाराम’चा गजर आभाळभर झालेला. ऊन सावल्यांचे खेळ. आभाळ भरून आलेलं. धावणारे ढग वाऱ्याची झुळूक.
दाट झाडांच्या सावल्या आणि सर्वत्र म्हणजे अगदी नजर जाईल तिथपर्यंत पाउले चालती पंढरीची वाट... विठ्ठलाची आम्हावरी सावली घनदाट... मनांत, जनांत पंढरी. मनांत पंढरी... जळी-स्थळी पंढरी... होय, एकच आस... एकच ध्यास... विठ्ठल विठ्ठल विठ्ठल!
सांगता येत नाही. किती किती वर्षं झाली. प्रत्येक वर्षी पंढरी म्हणजे नवी. नूतन. प्रत्येक वेळी विठुराया नवा. नूतन. नुसत्या त्याच्या नामस्मरणाने मनाला कसा छान थंडावा मिळत जातो.