Team Agrowon
भगवान बाबांचं राजयोगी नावाचं एक अतिशय सुंदर सर्वांगीण चरित्र इथं मिळालं. भगवान वामन मिसाळ नावाच्या एका एसटी खात्यातल्या साध्या कर्मचाऱ्यानं लिहिलेलं हे सहाशे पानांचं चरित्र इतकं उत्कंठावर्धक आहे की घरी परत आल्यावर तीन दिवसात मी ते भूतानं झपाटल्यासारखं वाचून काढलं.
अनेक संतांची जीवनचरित्रं आणि कादंबऱ्या मी वाचलेल्या आहेत. पण एखाद्या संताच असं उत्कट, रसाळ, परिपूर्ण, सुदीर्घ असं चरित्र माझ्या पाहण्यात नाही.
भगवान मिसाळ यांनी बारा वर्ष संशोधन करून, गावागावात जाऊन, भगवान बाबांना पाहिलेल्या माणसांना भेटून, प्रत्येक आठवणीच्या साक्षीदार माणसांच्या मुलाखती घेऊन हे चरित्र तयार केलेलं आहे.
मला मराठीतल्या पहिल्या चरित्राची, चक्रधर चरित्राची, म्हणजेच लीळाचरित्राचीच आठवण झाली. म्हाईम भट्टानं देखील अशीच मेहनत करून ते चरित्र लिहिलेलं होतं. तसंच आणि तितकंच उत्कट हे भगवान बाबांचं चरित्रही झालेलं आहे.
म्हटलं तर चरित्र आणि म्हटलं तर ही कादंबरी देखील आहे. मिसाळ यांनी प्रत्येक प्रसंग जिवंत केलेला आहे. त्यामुळे सहाशे पानापर्यंत उत्कंठा टिकून राहते. कंटाळा येत नाही.
भाविक भक्त हे चरित्र मोठ्या श्रद्धेनं वाचतीलच. सहाशे पानाच्या या पुस्तकाच्या मागच्या दहा वर्षात तीन आवृत्ती झालेल्या आहेत. पण ही एक वाङ्मयकृती आहे आणि वाङ्मयविश्वानंही तिची दखल घ्यायलाच हवी.
पण आपल्या मराठी वाङ्मयविश्वात अशी दखल कुणीही घेत नसतं. एका संताचं चरित्र, एका अनामिक लेखकानं लिहिलेलं, त्यात काय वाङ्मय असणार आहे ?
असा समज आपण करून घेतो आणि आपल्या गैरसमजात मग्न असतो. पण एखाद्या लोकसंताचं लोकचरित्र एखाद्या लोकलेखकानं कसं लिहावं त्याचा हा एक उत्तम नमुना आहे. त्या दृष्टीनेच या लेखनाचं कुणी संशोधनही करायला हरकत नसावी.
बाबांचा जन्म, बाबांच्या गावाची पार्श्वभूमी, बाबांचं बालपण, बाबांचं शिक्षण, बाबांना लागलेला अध्यात्माचा लळा, हे सगळं लेखकानं अत्यंत परिणामकारक पद्धतीनं मांडलेलं आहे.