अमित गद्रे
जातिवंत गीर गोवंश संवर्धन, शास्त्रशुद्ध पैदास, वंश सुधार आणि शाश्वत देशी गोपालनातील कार्य लक्षात घेऊन रावेत (पुणे) येथील प्रयोगशील गीर पैदासकार रविशंकर सहस्रबुद्धे यांना यंदाचा राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार जाहीर झाला आहे.
केंद्रीय मत्स्य, पशुसंवर्धन आणि डेअरी मंत्रालयातर्फे बुधवारी (ता. २३) या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.
देशी गोवंश सुधार, संवर्धन या विभागातील द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार रविशंकर सहस्रबुद्धे यांना जाहीर झाला आहे.
या बाबत ते म्हणाले, की मी गेल्या दहा वर्षांपासून गीर गोवंश संवर्धन, जातिवंत पैदास, वंश सुधार करत आहे.
यातून माझ्याकडे दररोज सरासरी १४ ते १५ लिटर दूध देणाऱ्या जातिवंत गीर गाई तयार झाल्या आहेत. तसेच पैदाशीसाठी वळूदेखील तयार झाले आहेत. त्यांच्या सर्व वंशावळ नोंदी माझ्याकडे आहेत.
पारंपरिक रेतन पद्धतीच्या बरोबरीने मी कृत्रिम रेतन, भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. केंद्रीय मत्स्य, पशुसंवर्धन आणि डेअरी मंत्रालयातर्फे तीन विभागांमध्ये पुरस्कार जाहीर झाले आहेत.
याचबरोबरीने उत्कृष्ट कृत्रिम रेतन तज्ज्ञ आणि सहकारी दुग्ध संस्था विभागातही पुरस्कार जाहीर झाले आहेत. २६ नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय दुग्ध दिनानिमित्त बंगळूर येथे मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार विजेत्यांना प्रमाणपत्र, स्मृती चिन्ह आणि पुरस्कार रकमेसह राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.https://www.agrowon.com/web-stories