Team Agrowon
आपले कळसुबाई मिलेटचे नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील शेतकरी प्रतिनिधी मैसूर येथे भरलेल्या किसान स्वराज संमेलनाला उपस्थित होते.
येथे देशभरातून आलेल्या ७० बियाणे संवर्धक गटात आपलयाला देखील आपल्या कृषीविविधतेचे प्रदर्शन stall मांडण्याची संधी मिळाली.
आपल्या सर्व शेतकऱ्यांना देशभरातून आलेल्या व्यक्ती व शेतकऱ्यांशी संवाद साधता आला. हिंदी कधीही न बोलण्याची सवय असलेल्या आपल्या शेतकऱ्यांनी हावभावातून, कधी हिंदी मराठी मिश्र भाषेत संवाद साधण्याचा प्रयत्न केला.
संमेलन संपल्यावर मैसूर दर्शन, आणि तेथून २ दिवस भाताच्या १३५० जातींचे संवर्धन व विविध प्रयोग करणारा तरुण शेतकरी घणी खान याच्या शेतावर मुक्काम, मिलेट प्रक्रिया करणाऱ्या मोठ्या कंपनीला भेट व महिलांच्या माध्यमातून मिलेट प्रक्रिया करून उत्पन्न मिळवून देणारी शेतकरी कंपनीला भेट, कावेरी नदीचा प्रसिद्ध धबधबा आणि सोमनाथपूरचे प्राचीन कोरीव मंदिर असे भरगच्च भटकंती करून आम्ही परतलो.
येताना आपल्या कारभारणीसाठी मैसूर सिल्क साडी, भरपूर काही ज्ञानाची शिदोरी व चिरकाल टिकणार्या आठवणी सोबत घेऊन सर्व परतलो.
या सर्व १० दिवसाच्या प्रवासात मी सोडून कुणी आजारी पडले नाही. वातावरणात थंडी आणि वेगवेगळ्या ठिकाणचे पाणी आम्ही प्यालो.
सतत भटकत होतो, कधी बसने तर कधी ट्रेनने, हजारो लोकांचा संपर्क होत होता. परतल्यापासून आज जरा बरे वाटले आहे म्हणून आपला हा संवाद सुरु झाला.