Crop Insurance : पीक विम्याच्या पूर्वसूचनाकडे शेतकऱ्यांची पाठ ?

Team Agrowon

विमा हप्ता जमा (Insurance Premium) करूनही भरपाई (Compensation) मिळत नाही. म्हणून शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीकविमा योजनेकडे पाठ फिरवली होती. यवतमाळ जिल्ह्यात चार लाख पंधरा हजार शेतकऱ्यांनी योजनेसाठी नोंदणी केली आहे.

मात्र त्यापैकी केवळ दीड लाख शेतकऱ्यांनी नुकसान पूर्व सूचनांचे अर्ज (Intimation Application Of Crop Insurance) सादर केले आहे. शेतकऱ्यांनी कोणत्याही संभ्रमात न राहता नुकसान भरपाईचे अर्ज वेळेत सादर करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

पीक विमा हप्ता भरल्यानंतर ही शेतकऱ्यांना भरपाई मिळत नाही असा काही वर्षातील अनुभव आहे. त्यामुळेच गेल्या काही वर्षात विमा योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या सातत्याने कमी होत आहे.

यंदा यवतमाळ जिल्ह्यात चार लाख पंधरा हजार शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभाग नोंदविला आहे. शेतकऱ्यांना बीड पॅटर्ननुसार भरपाई मिळेल असा दावा केला जात आहे.

मात्र त्यानंतरही शेतकऱ्यांना मात्र कंपनीवर विश्वास नसल्याने त्यांचा योजनेला कमी प्रतिसाद मिळाला आहे. विमा योजनेतील सहभागी शेतकऱ्यांची संख्या कमी असतानाच जिल्ह्यात पावसामुळे झालेल्या नुकसानीपोटी भरपाई मिळावी याकरिता पूर्व सूचना देणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या त्यापेक्षाही कमी आहे.

आतापर्यंत जिल्ह्यातून केवळ दीड लाख शेतकऱ्यांनी नुकसान पूर्वसूचना कंपनीला दिल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी तत्काळ प्रधानमंत्री पीक विमा योजनेची आढावा बैठक घेतली.

कोणत्याही परिस्थितीत नुकसान पूर्व सूचनांचे अर्ज आले नाही म्हणून विमा दावे नाकारण्याचे प्रकरण होणार नाही याची दक्षता घ्यावी अशी निर्देश जिल्हाधिकारी येडगे यांनी दिले.

येडगे म्हणाले, की भरपाईचे अर्ज उशिरा केल्यास जास्त रक्कम मिळेल असा गैरसमज काही शेतकऱ्यांमध्ये आहे. मात्र अर्ज आता किंवा नंतर सादर केला तरी पंचनाम्यात नमूद टक्केवारीनुसारच भरपाई मिळणार आहे.