Anuradha Vipat
उपवासाच्या दिवशी साबुदाणा खिचडी किंवा वडे खाऊन कंटाळा आला असेल, तर खमंग आणि कुरकुरीत उपवासाची थालीपीठ हा एक उत्तम, पौष्टिक आणि झटपट होणारा पर्याय आहे.
वरईचे पीठ ,साबुदाणा पीठ,उकडलेला बटाटा,शेंगदाण्याचा कूट,हिरवी मिरची पेस्ट / बारीक चिरलेली मिरची,जिरे,बारीक चिरलेली कोथिंबीर,सेंदलोण / उपवासाचे मीठ,तूप किंवा तेल,कोमट पाणी.
मोठ्या परातीत वरईचे पीठ, साबुदाणा पीठ, शेंगदाण्याचा कूट, जिरे, कोथिंबीर, मिरची पेस्ट आणि चवीनुसार मीठ एकत्र करून घ्या. त्यात किसलेला उकडलेला बटाटा घाला आणि सर्व साहित्य हाताने चांगले एकजीव करा.
थोडे-थोडे कोमट पाणी घालून घट्ट गोळा मळून घ्या. पीठ मळल्यावर १० मिनिटे झाकून ठेवा.
एक स्वच्छ सुती कपडा ओला करून पोळपाटावर पसरवा. पिठाचा एक मध्यम आकाराचा गोळा घ्या. हाताला थोडे पाणी किंवा तूप लावून घ्या आणि बोटांच्या साहाय्याने थालीपीठ पातळ आणि एकसारखे थापून घ्या.
गॅसवर तवा गरम करायला ठेवा आणि तव्याला थोडे तूप लावून घ्या. कपड्यावर थापलेले थालीपीठ कपड्यासहित तव्यावर उलटे टाका आणि वरून कपडा अलगद काढून घ्या.
थालीपीठाच्या कडेने आणि मधल्या छिद्रांमध्ये थोडे तूप सोडा. मंद ते मध्यम आचेवर थालीपीठ दोन्ही बाजूंनी सोनेरी रंग आणि कुरकुरीत होईपर्यंत छान भाजून घ्या.