Anil Jadhao
सध्या देशात सुताचे दर कमी झालेले आहेत. मात्र तरीही कापड उद्योगाकडून सुताला कमी उठाव असल्याने देशातील सूतगिरण्यांकडे सुताचा मोठा साठा पडून असल्याचे सांगितले जात आहे. हा साठा बाहेर काढण्यासाठी सूतगिरण्या प्रयत्न करत आहेत.
सूतगिरण्या मोठ्या खरेदीदारांना सवलतही देत आहेत. मात्र तरीही सुताला मागणी अपेक्षेप्रमाणे वाढली नाही. एक तर सुताचे दर कमी झाल्यानंतर मागणी वाढले किंवा कापड बाजारात चैतन्य आल्यानंतर सुताला मागणी येईल, असंही सांगितलं जात आहे.
मात्र सुताचे दर हे कापसाच्या दरावर थेट अवलंबून असतात. चालू हंगामात नोव्हेंबर महिन्यात कापूस दरात ९ हजार ५०० रुपयांचा टप्पा गाठला होता. मात्र सध्या दर ८ हजार ५०० ते ९ हजार रुपयांच्या दरम्यान आहेत.
कापसाचे दर नरमले तशी बाजारातील कापूस आवकही कमी झाली. देशातील बाजारात एरव्ही दैनंदीन सरासरी दोन ते सव्वादोन लाख गाठींच्या दरम्यान आवक असते. मात्र सध्या केवळ एक ते एक लाख १० हजार गाठींच्या दरम्यान आवक होत आहे.
देशातील कापूस दर सध्या आंतरराष्ट्रीय बाजारातील दरापेक्षा जास्त आहेत. तसंच शेतकऱ्यांच्या कापूस विक्रीवरच कापसाचे दरही टिकून असल्याचे जाणकारांनी सांगितले.
बाजारात या परिस्थितीत कापसाची आवक वाढल्यास दर दबावात येऊ शकतात. मात्र शेतकऱ्यांनी कापसाची मर्यादीत विक्री केल्यास दर टिकून राहतील.डिसेंबरमध्ये कापूस दरात चढ उतार होऊ शकतात. मात्र बाजारातील आवक कमी राहील्यास पुढील महिन्यात कापूस दर सुधारतील, असा अंदाज कापूस बाजातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.