टीम ॲग्रोवन
अमेरिकन बाजारात (Cotton Market America) घडणाऱ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भारतीय बाजारात कापसाचे दर (Indian Market Cotton Rate) मुहूर्ताला आठ ते नऊ हजार रुपये इतकेच राहण्याची शक्यता जाणकारांनी वर्तवली आहे.
कापूस व्यापार क्षेत्रातील जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानात अतिवृष्टीमुळे तर चीनमध्ये कोरड्या दुष्काळामुळे कापसाचे उत्पादन कमी होणार, अशी चर्चा रंगली होती.
अमेरिकेतही मध्यंतरी पाऊस कमी होता. त्यामुळे तिथेही कापसाची उत्पादकता कमी होईल, अशी शक्यता होती.
अमेरिकेच्या बाजारात आता मात्र कापसाचे भाव पडू लागले आहेत. गेल्या वर्षी एक पाउंड रुईचा भाव एक डॉलर ७० सेंट पर्यंत वाढला होता. तो मध्यंतरी एक डॉलर १५ सेंट पर्यंत घसरला.
त्यानंतर कमी उत्पादकतेच्या शक्यतेमुळे त्यात वाढ होत एक डॉलर ३० सेंटपर्यंत तो पोहोचला. भारताचा विचार करता पंजाब- हरियानाच्या बाजारपेठेत नवीन कापसाची आवक सुरू झाली आहे.
या कापसाला सुरुवातीला नऊ हजार ते दहा हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. त्यामुळे यंदाही कापसाला चांगले दर मिळतील, अशी अपेक्षा होती. परंतु अचानक अमेरिकन बाजारात कापसाच्या दरात घट झाली.
एक पाउंड रुईचा दर हा एक डॉलर १२ सेंट पर्यंत घसरला. त्यामुळे येत्या काळात भावातील ही पडझड आणखी होण्याची शक्यता आहे.