Cotton Crop : अतिपावसामुळे कापूस उत्पादक शेतकरी हैराण

Team Agrowon

जळगाव जिल्ह्यात भोकर, पिंप्राळा (ता. जळगाव), चोपड्यातील अडावद आदी भागात अतिपाऊस झाला. तसेच पाचोरा, जामनेर, अमळनेर, चोपडा, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव आदी भागात कापूस पिकाला (Cotton Crop Damage) मोठा फटका बसला आहे.

मे अखेरीस लागवड केलेल्या पूर्वहंगामी (Pre-Monsoon) (बागायती) कापूस पिकाची मोठी हानी झाली आहे.

मागील चार-पाच दिवस खानदेशातील कापूस पट्ट्यात (Cotton Belt) अतिपाऊस (Heavy Rain In Cotton Belt) झाला आहे. सततच्या पावसाने उमललेल्या बोंडांत कोंब (Boll Sprouting) तयार झाले आहेत. तर पक्व कैऱ्या काळवंडून त्यांचे १०० टक्के नुकसान (Cotton Crop Damage) झाले आहे.

एका झाडावर किमान १५ ते २० बोंडे उमलली होती. ही बोंडे काळवंडून त्यांचे १०० टक्के नुकसान झाले आहे. कारण त्यात कोंबही आले आहेत. त्याची वेचणी करणे शक्य नाही. कारण खरेदीदार ही बोंडे घेणार नाहीत.

अशातच पाऊस सुरूच आहे. यामुळे हे नुकसान वाढत आहे. पावसाने फुले, पाते गळ वाढली आहे. स्वच्छ सूर्यप्रकाशीत वातावरणाची नितांत गरज आहे. परंतु रोज पाऊस, ढगाळ वातावरण अशी स्थिती आहे.

या पिकात एका झाडावर ५० ते ८० कैऱ्या पक्व होत्या. काही शेतकऱ्यांनी मागील पंधरवड्यात उघडीप असताना कापूस वेचणीदेखील उरकली. काही शेतकऱ्यांच्या पिकात बोंडे उमलत असतानाच पाऊस सुरू झाला.

खानदेशात सुमारे नऊ लाख हेक्टरवर कापूस लागवड झाली आहे. एकट्या जळगाव जिल्ह्यात पाच लाख ६७ हजार हेक्टरवर कापूस पीक आहे. यात सुमारे एक लाख २० हजार हेक्टरवर पूर्वहंगामी किंवा बागायती कापूस पीक आहे.

धुळे व नंदुरबारात मिळून साडेतीन लाख हेक्टरवर कापूस लागवड झाली आहे. यात सुमारे ५० हजार हेक्टरवर पूर्वहंगामी कापूस पीक आहे. या पूर्वहंगामी कापूस पिकाला मोठा फटका बसला आहे.

cta image