Market rate: कापूस, सोयाबीन, तूर, हरभऱ्याला आज काय दर मिळाला?

Anil Jadhao 

राज्यातील बाजारात आजही कापसाची आवक कमीच होती. तर कापसाला सरासरी ८ हजार ते ८ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान दर मिळाला. पुढील काळात कापसाचे दर वाढण्याचा अंदाज आहे.

शेतकऱ्यांनी बाजारातील सोयाबीन विक्री सध्या मर्यादीत ठेवली आहे. त्यामुळे सोयाबीनचे दर टिकून आहेत. सध्या सोयाबीनला सरासरी ५ हजार २०० ते ५ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळत आहे.

राज्यातील काही बाजारांमध्ये नव्या तुरीची आवक आता वाढत आहेत. नव्या तुरीला सध्या बाजारात सरासरी प्रतिक्विंटल ६ हजार ५०० ते ७ हजार ५०० रुपये दर मिळत आहे.

देशातील काही बाजारांमध्ये आता नव्या हरभऱ्याची आवक सुरु झाली. मात्र हरभऱ्याचे दर अद्यापही दबावात आहेत. सध्या हरभऱ्याला बाजारात सरासरी ४ हजार ६०० ते ४ हजार ९०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळत आहे.

मक्याला सध्या २ हजार १०० ते २ हजार ३०० रुपये दर मिळत आहे. राज्यातील बाजारात सध्या मक्याची आवक वाढली आहे. त्यामुळे दरावर काहीसा दबाव जाणवत आहे.

मागील काही दिवसांपासून बाजारातील हिरव्या मिरचीची आवक घटली. त्यामुळे हिरव्या मिरचीचे दर वाढले आहेत. सध्या हिरव्या मिरचीला सरासरी २ हजार ते ३ हजार रुपये दर मिळत आहे.