Team Agrowon
मागील दुष्काळात आपण होरपळून निघालोत त्याचे परिणाम आजही भोगत आहोत. त्यातच परत एकदा जगावर अल निनोचा प्रभाव जास्त वाढल्याने भारतात कोरडा दुष्काळ पडू शकतो, असे एका विदेशी हवामानविषयक अभ्यास करणाऱ्या संस्थेतील तज्ज्ञांचे भाकीत आहे.
दुष्काळाची सर्वांत जास्त दाहकता आशिया खंडात असेल. त्यामुळे आपल्या देशात चिंतेचे वातावरण निर्माण झालेले आहे.
कारण आपल्याकडे काही भागात मार्च महिन्यातच पिण्याचे पाणी टँकरने देणे सुरू झालेले आहे. जर येणाऱ्या पावसाळ्यात पाऊस कमी पडला तर खूप मोठ्या संकटांना सर्वांना तोंड द्यावे लागेल.
दुष्काळ म्हटलं, की निसर्ग चक्रात बदल होऊन त्याचा विपरीत व दूरगामी परिणाम सर्व सजीवांच्या जीवनावर होत असतो. सर्व सजीवांना जगण्यासाठी लागणारे साधन यांचा तुटवडा निर्माण होतो.
कोरडा दुष्काळ असेल तर सर्वांत महत्त्वाचे म्हणजे पाणी कमी होईल. ज्या भागात पाण्याची पातळी अगोदर ३०० फुटांपेक्षा जास्त खोल गेलेली आहे त्यांनी पाणी आणायचे कोठून अशी परिस्थिती निर्माण होईल. त्यामुळे जंगली प्राणी, पक्षी, किडे हे पाण्यावाचून तडफडून मरतील.
मोठमोठे वृक्ष जळतील, शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने उभा केलेल्या फळबाग पाण्याअभावी जाळून जातील. पाळीव जनावरांना पाणी व चारा याचे मोठे संकट शेतकऱ्यांसमोर उभे राहील.