Anil Jadhao
मागील १५ दिवसांमध्ये देशातील हरभरा पेरणीचा वेग मागीलवर्षीच्या तुलनेत जास्त होता. २ डिसेंबरपर्यंत हरभरा पेरणी मागीलवर्षी याच काळात झालेल्या लागवडीपेक्षा साडेपाच टक्क्यांनी जास्त होती.
केंद्रीय कृषिमंत्रालयाने ९ डिसेंबरला प्रसिध्द केलेल्या आकडेवारीनुसार हरभरा पेरणीचा वेग कमी झाला. गेल्यावर्षीच्या तुलनेत पेरणीची आघाडी आता अडीच टक्क्यांवर आली.
गेल्या आठवड्यात हरभरा पेरणी क्षेत्र ८० लाख हेक्टरवर होते, ते आता ८९ लाख हेक्टरवर पोचले. म्हणजेच गेल्या आठवडाभरात देशात केवळ ९ लाख हेक्टरवर हरभरा पेरणी झाली. तर गेल्यावर्षीचं क्षेत्र ८७ लाख हेक्टर होतं.
सध्या मध्य प्रदेशातील हरभरा पेरा कमी झालेला दिसत आहे. मध्य प्रदेशात मागील हंगामात याच काळात २२ लाख ५३ हजार हेक्टरवर हरभरा पीक होते. मात्र यंदा १८ लाख ६० हजार हेक्टरवरच लागवड झाली.
राजस्थानमध्ये जवळपास २१ लाख हेक्टरवर लागवड झाली. तर मागील हंगामातील क्षेत्र १९ लाख ४० हजार हेक्टर होते. महाराष्ट्रात जवळपास ५ लाख हेक्टरने पेरणी आघाडीवर आहे. मागील हंगामात १४ लाख १९ हजार हेक्टरवर आजच्या तारखेपर्यंत लागवड झाली होती. मात्र यंदा क्षेत्र १९ लाख २७ हजार हेक्टरवर पोचली.