Anil Jadhao
यंदा देशातील हरभरा लागवड कमी झाली. शेतकरी आणि जाणकारांच्या मते देशातील हरभरा लागवडीतील घट जास्त आहे. त्यामुळं यंदा देशातील हरभरा उत्पादनात घट होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
देशातील बाजारात सध्या नव्या हरभऱ्याची आवक होत आहे. नव्या मालात ओलावाही काहीसा अधिक येतोय. मात्र गुणवत्ता चांगली असल्याचं व्यापारी सांगत आहेत.
हरभऱ्याला ४ हजार ७०० ते ४ हजार ९०० रुपये दर मिळतोय. यंदा सरकारनं हरभऱ्यासाठी ५ हजार ३३५ रुपये प्रतिक्विंटलचा दर जाहीर केला. म्हणजेच सध्या बाजारात मिळणारा दर हमीभावापेक्षा कमी आहे.
यंदा उत्पादन घटीचा अंदाज आत्तापासूनच व्यक्त केला जात आहे. त्यामुळं स्टाॅकिस्ट आणि प्रक्रियादार हरभरा खेरदीत उतरु शकतात. सरकारच्या हमीभाव खरेदीचाही हरभरा दराला आधार मिळेल, असं जाणकारांनी सांगितलं.
देशात यंदा हरभरा उत्पादन घटण्याचा अंदाज आहे. पण तरीही मागील हंगामातील साठाही शिल्लक आहे. त्यामुळं यंदा हरभरा बाजाराला हमीभाव खरेदीचा आधार गरजेचा आहे.
सरकार खरेदीत असल्यास खुल्या बाजारातील भावही हमीभावाच्या दरम्यान राहू शकतात. त्यामुळे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सरकारने हमीभावाने हरभरा खरेदी लवकर सुरु करणे गरजेचे आहे.